Pune
Pune

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता अधिकृतरीत्या ‘राजगड’ हे नवे नाव मिळाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता अधिकृतरीत्या ‘राजगड’ हे नवे नाव मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेला ऐतिहासिक राजगड किल्ला याच तालुक्यात असल्याने या नावाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.

ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि नागरिकांकडून होत होती. तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी सकारात्मक ठराव मंजूर केला होता. तसेच 22 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ‘राजगड’ हे नाव देण्याची शिफारस मंजूर करण्यात आली होती. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली होती.

यानंतर महसूल विभागाने प्रस्ताव पुढे पाठवला आणि अखेर राज्य मंत्रिमंडळाने नाव बदलाला मान्यता दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया गतीमान करण्यात आली होती. केंद्र सरकारकडूनही आता या नावाला मान्यता मिळाल्याने वेल्हे तालुका अधिकृतपणे राजगड तालुका म्हणून ओळखला जाईल. लवकरच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे.

राजगड आणि तोरणा यांसारखे गड-किल्ले असलेला हा परिसर ऐतिहासिक वारसा जपत आहे. आता तालुक्याला ‘राजगड’ हे नाव मिळाल्याने स्थानिकांचा दीर्घकाळाचा इतिहासाशी निगडित असलेला आग्रह प्रत्यक्षात उतरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com