Pune News : पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल राहणार बंद ; प्रवाशांनी 'या' पर्यायी पूलांचा वापर करावा
पावसाळ्यात कायमच चर्चेत असणारा पुण्यातील बाबा भिडे पूल 20 एप्रिल 2025 पासून 6 जून 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्य पेठांशी जोडणाऱ्या पादचारी फूटब्रिजचे बांधकामाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्त्याच्या रहिवाशांसाठी मेट्रो स्थानकापर्यंतची पोहचणे अधिक सुलभ होणार आहे.
पूल बंद असला तरी त्याच्या बाजूचा रिव्हरसाईड रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेडब्रिज हे पर्यायी मार्ग म्हणून वापरावेत व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
पूना हॉस्पिटल समोरील पूल हा फक्त दुचाकींकरता उपलब्ध असणार आहे.डेक्कन पीएमटी स्थानकाकडून नारायण पेठेत जात असताना चालकांनी टिळक चौकातुन पुढे जावे असे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्यात पुण्यातील भिडे पूल कायमच चर्चेत का असतो. मुळा नदीच्या पातळीवर वाढ झाल्यास पाणी पुलावरून वाहते आणि म्हणून सुरक्षितेच्या कारणासाठी हा पूल काही दिवसांसाठी बंद ठेवतात. यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते. भिडे पुलावरून पाणी वाहिल्यानंतर पाऊस जोरदार झाला आहे असे अनुमान पुणेकर बांधतात.
भिडे पुलाचे खरे व अधिकृत नाव आहे "बाबा भिडे पूल"
हा पूल पुण्यातील नारायण पेठ आणि शनिवार पेठ या भागांना जोडतो आणि मुळा नदीवर बांधलेला आहे. याचे नाव स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक बाबा भिडे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मात्र, पुण्यातील स्थानिक लोक सहसा त्याला फक्त "भिडे पूल" म्हणून ओळखतात.