महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाच्या दृष्टीने २५ कोटींचा करार; रोहित पवारांची घोषणा

महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाच्या दृष्टीने २५ कोटींचा करार; रोहित पवारांची घोषणा

पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच यांचा एमसीएशी सहकार्य करार

पुणे : महाराष्ट्रातील क्रिकेट विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) यांनी पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच यांच्याशी पाच वर्षाचा सहकार्य करार केला आहे. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार आणि पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांनी आज ही घोषणा केली.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे रोहित पवार आणि पुनीत बालन, एमसीएचे सर्व ऍपेक्स कमिटी सदस्य यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी पुनित बालन ग्रुपचे चेअरमन व मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन उपस्थित होते.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करताना सांगितले की, हा करार पाच वर्षांसाठी असून त्यातून संघटनेला पुनित बालन ग्रुप व ऑक्सिरिचकडून दरवर्षी पाच कोटी रुपये मिळणार आहेत. या करारान्वये महाराष्ट्राच्या रणजी संघासह सर्व वयोगटांमधील पुरुष व महिला संघांमधील खेळाडूंच्या पोशाखावर समोरच्या बाजूला पुनित बालन ग्रुपचा लोगो असेल, तर बाहीवर माणिकचंद ऑक्सिरिचचे बोधचिन्ह राहील. तसेच या सहकार्य करारामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा, आधुनिक साधनसुविधा व खेळाडूंसाठी नव्या योजनांबरोबरच राज्यातील दुर्गम ठिकाणांमध्येही गुणवत्ता शोध मोहीम राबविणे व युवा खेळाडूंच्या विकासासाठी योजना राबविणे शक्य होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच हे पुण्यातील आघाडीचे व्यवसाय समूह असून क्रीडाक्षेत्रातील त्यांचे कार्य स्पृहणीय आहे. त्यांनी विविध खेळांना, तसेच अनेक खेळाडूंना पाठिंबा देताना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी साहाय्य केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील क्रिकेटचे उज्वल भवितव्य ध्यानात घेऊन या सहकार्य करारासाठी आम्ही त्यांची निवड केली, असेही पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी या वेळी एमसीएच्या लातूर व धुळे येथील क्रीडासंकुलांच्या आणि तेथील सुविधांच्या विकसनासाठी विविध उद्योगसंस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच या संकुलांच्या नामकरणाचे हक्क खरेदी करण्यासाठीही त्यांनी उद्योगसंस्थांना आवाहन केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com