पुरंदर तालुक्यातील संपूर्ण धालेवाडी गाव करणार मरणोत्तर अवयवदान

पुरंदर तालुक्यातील संपूर्ण धालेवाडी गाव करणार मरणोत्तर अवयवदान

Published by :
Published on

पुण्यातील पुरंदर तालुक्यात असणारे धालेवाडी या गावाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून व सारथी युवा फाउंडेशनच्या मदतीने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. धालेवाडी हे संपूर्ण गाव या अनोख्या उपक्रमात उस्फुर्त सहभागी झालं आहे. या उपक्रमांतर्गत गावातील सर्व लोकांनी मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे हा उपक्रम? :

● धालेवाडी, पुरंदर तालुक्यातील एक छोटंसं गाव. साधारणतः हजार ते बाराशे लोकसंख्या असलेलं गाव. याच गावातील लोकांनी एक महत्व पूर्ण निर्णय घेतला आहे. या गावातील प्रत्येक व्यक्ती मरणोत्तर अवयव दान करणार आहे.

● यासाठी धालेवाडी गावचे सरपंच शरद काळाणे आणि सोसायटीचे चेअरमन हनुमंत काळाणे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत व युवा सारथी फाउंडेशनच्या मदतीने काही दिवसापूर्वी ग्रामस्थांना याबाबत आवाहन केले केले होते.

● यामध्ये प्रत्येक कुटुंबातून किमान एका व्यक्तीने अवयव दान करावं, असं त्यांनी म्हटले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 90 टक्के ग्रामस्थांनी मरणोत्तर अवयव दन करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच लवकरच 100 टक्के अवयव दान करणारे पहिले गाव धालेवाडी असेल, असा निर्धार यावेळी हनुमंत काळाणे यांनी व्यक्त केला आहे.

● या उपक्रमासाठी सारथी युवा फाउंडेशनचे अनिल खोपडे देशमुख, अमोल दरेकर, अनुजा हनुमंत शिंदे, तनुजा रामदास ढमाळ, सारिका खोपडे, दिप ढमाळ धालेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य  प्रभाकर भालेराव, सदस्या वंदना काळाणे, शशिकला साबळे, लक्ष्मीबाई कदम, अंकिता काळाणे आदींनी यासाठी मेहनत घेतली आहे.

● सदर उपक्रम राबवावा याचा प्रस्ताव वंदना काळाणे यांनी मांडला होता. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या उपक्रमाबद्दल धालेवाडीचे कौतुक केले आहे.

● आदर्श गाव धालेवाडी आता देशासमोर एक नवा आदर्श निर्माण करत आहे. आम्ही केलेल्या मरणोत्तर अवयव दान आव्हानाला आमच्या गावातील सर्व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत संपूर्ण गाव अवयव दान करणारं देशातील पहिले गाव धालेवाडी ठरेल, असा विश्वास देखील धालेवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com