पुरुषोत्तम करंडकाचा मान यंदा कोणालाच नाही!

पुरुषोत्तम करंडकाचा मान यंदा कोणालाच नाही!

स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली घटना

अमोल धर्माधिकारी | पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा ऐतिहासिक निकाल लागला आहे. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. तसेच, सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार न आढळल्याने ही पारितोषिकेही कोणालाच जाहीर करण्यात आली नाहीत.

करंडकासाठी पात्र एकांकिका नसली तरी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून ते पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती या महाविद्यालयाच्या ‘भू भू’ या एकांकिकेस जाहीर झाला आहे. तर, तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, शिवाजीनगर या महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेस जाहीर झाला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही कोणताही पात्र संघ न आढळल्याने जाहीर करण्यात आले नाही.

पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन नाट्यविश्वातील प्रतिष्ठेची समजली जाते. महाराष्ट्रीय कलोपासक पुणे पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा 1963 पासून सुरू आहे. या स्पर्धेचे हे यंदाचे 56 वे वर्ष आहे. या स्पर्धेत दरवर्षी 51 महाविद्यालय सहभाग घेतात. या स्पर्धेने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत. यात सुबोध भावे, तेजस बर्वे, प्रियांका बर्वे, पर्ण पेठे, गिरीजा ओक यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील एकांकिता पाहण्यासाठी नाट्यप्रेमी गर्दी करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com