Rahul Shewale: ठाकरेंच्या जाहीरनाम्यात हिंदू आणि हिंदुत्व शब्द वगळले, राहुल शेवाळे यांचा ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल
मराठीसाठी एकत्र आलेल्या उबाठा आणि मनसेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जारी केलेल्या वचननाम्यात ४० टक्के इंग्रजी शब्दांचा वापर केला असून, मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द जाणीवपूर्वक वगळले आहेत. यावर बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असल्याची घणाघाती टीका शिवसेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली. मराठीऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर केल्यास खळखटयाक करणारे आता वचननाम्यातून मराठीची गळचेपी कशी करणार, असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित केला.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेवाळे म्हणाले की, स्वतःला हिंदुह्रदयसम्राटांचा वारस समजणारे उबाठा-मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हे वचननामा तयार केला. वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे पण आत्मा नाही. हिंदुह्रदयसम्राटाचा उल्लेख टाळून जन्मशताब्दी वर्षातच अवमान केला गेला. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय किंवा कोळीवाड्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत का केली नाहीत, असा प्रश्नही शेवाळे यांनी विचारला.
२०१७ च्या वचननाम्यातील मराठी रंगभूमीसाठी दालन, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना नोकरी, पूर्व उपनगरात वैद्यकीय महाविद्यालय, गारगाई पिंजळ धरण आणि समुद्र पाणी गोडकरणाचे आश्वासन कॉपी-पेस्ट करून इंग्रजीत सादर केले, असा टोला शेवाळे यांनी लगावला. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असा आग्रह करत बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंचवार्षिक कार्यक्रम, मराठी माणसांसाठी अर्थसहाय्य आणि पुनर्वसनाचे शिवसेनेकडून घोषित करणार आहोत, असे सांगितले.
‘हा शब्द ठाकरेंचा’वर सडकून टीका करत शेवाळे म्हणाले की, बाळासाहेबांचा शब्द धनुष्यबाणासारखा आर-पार जाणारा होता, पण ठाकरेंचा यूटर्न मारणारा आहे. विश्वासघातकी, पाठीत खंजीर खुपसणारे आणि भ्रष्टाचाराचे हे लोक मुंबईकरांना फसवू शकणार नाहीत, असा इशारा शेवाळे यांनी दिला.
