जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी नाले तलाव धरणे तुडुंब भरले
मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील महापुरानंतर आता पावसाने पाचोरा जामनेर पारोळा व जिल्ह्यात इतरत्र हाहाकार केला आहे.
जिल्ह्यातील हतनूर बोर वाघुर गारबर्डी बाहुळ व इतर मध्यम प्रकल्प धरणे तुडुंब भरली असून तापी वाघूर बोर कंक उंबर नाला नदीला पूर आला आहे त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पारोळा तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर पाचोरा तालुक्यातील उतावळी नदीला पूर आल्याने खेडगाव नंदीचे या ठिकाणी गावात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे तर जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली असून उंबर नाला नदीला पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे , भागदरा गावानजीक असलेला तलाव फुटल्याने भागदरा गावात पाणी शिरले असून शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. जामनेर येथील कंक नदीला पूर आल्याने जामनेर-भुसावळ मार्ग बंद झाला आला आहे तर जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अद्यापही जिल्ह्यात पाऊस सुरू असून पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना तातडीने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहे.