Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
(Rain Update) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे सात लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांवर त्याचा परिणाम झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
आज सकाळपासून पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ठाणे, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्याच्या डोंगराळ भागात आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर कमी होणार असून कोकण व घाटमाथ्यावरील काही भागांत हलक्या सरी पडतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र तुलनेने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी कोकणातील काही भागांत हलक्या सरी, तर शनिवारी व रविवारी कोकण व पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उर्वरित महाराष्ट्रात पावसाला विश्रांती मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. ही परिस्थिती पाहता शेतकरी आणि नागरिकांना हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.