Raj Thackeray: राज ठाकरेंचा वाढवण जवळ विमानतळ बांधण्यास विरोध
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज प्रसारित झालेल्या दुसऱ्या भागात दोन्ही बंधूंनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोठे कारस्थान सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. विशेषतः वाढवण बंदरा जवळील विमानतळाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी रोखठोक मत मांडले, ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रातून वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, एमएमआर क्षेत्रातील घडामोडींकडे लक्ष वेधले. वाढवण बंदराला लागून विमानतळ उभारण्यामागील हेतू उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले, नवी मुंबईतील नवीन विमानतळावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातील सर्व कार्गो हलवण्याची सुरुवात झाली आहे.
हळूहळू डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळसुद्धा तिथे हलवले जातील. अदानी समूहाकडे आलेल्या मुंबई विमानतळाचे क्षेत्रफळ इतके मोठे आहे की, त्यात कमीतकमी ५० शिवाजी पार्क मैदाने बसतील. विमानतळ हलवून हा जागा विक्रीस काढण्याचा हा प्लॅन असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
याशिवाय, राज ठाकरे यांनी अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले, मोदीजी मोठे होण्यापूर्वीच अंबानी मोठे होते, पण अदानी हे मोदी मोठे झाल्यानंतरच मोठे झाले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी अदानीला मुंद्रा पोर्ट दिला आणि पंतप्रधान झाल्यानंतर अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. भाजपवर टीका करत त्यांनी विचारले, जर काँग्रेस किंवा इतर पक्ष सत्तेत असून एखाद्या उद्योगपतीवर इतकी मेहरबानी केली असती, तर भाजप कसा रिअॅक्ट केला असता? या प्रश्नाने भाजप धोरणावर सवाल उपस्थित केले गेले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत राजकीय चर्चांना नवे वळण देणारी ठरली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या या रोखठोक बोलण्याने मुंबईतील विकास आणि सत्तासमिकरणावर नवीन वाद सुरू झाला आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी वाढवण विमानतळाच्या विरोधात ठोस मत व्यक्त केले
उद्धव-राज ठाकरे मुलाखतीत मुंबई वेगळे करण्याचा आरोप
अदानी आणि अंबानी यांच्यात फरक स्पष्ट करत भाजप धोरणांवर सवाल
मुलाखतीने मुंबई विकास आणि नगरपालिका निवडणुकीत राजकीय वाद वाढवला
