Raj Thackeray: पाडू यंत्राबाबत आम्हाला सांगावसंदेखील वाटलं नाही का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांना उद्या (१५ जानेवारी) अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयावर कडाडून टीका केली. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना मतदान दिवशी दुपारी ५ वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची मुभा देणाऱ्या नियमावर त्यांनी सरकार आणि आयोगावर गंभीर आरोप केले. 'ईव्हीएमसोबत ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) मशीन आणली, पण राजकीय पक्षांना दाखवली नाही का? सरकारसाठी आयोग काम करतोय का?', असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी सांगितले, 'प्रचार ५ वाजता संपतो, दुसरा दिवस रिकामा राहतो आणि मग मतदान, ही जुनी प्रथा होती. आता नवीन नोटिफिकेशन काढून मतदान दिवशी ५ वाजेपर्यंत भेटी घेण्यास मुभा का? विधानसभा-लोकसभेत का नव्हते? मतदारांना भेटा, पत्रके द्या किंवा पैसे वाटा, असा हेतू आहे का?' ते म्हणाले, 'भाजप आणि शिंदे गटाकडून पॅम्फ्लेटमध्ये पैसे टाकून वाटले जात आहेत, लोक नाकारत आहेत ही चांगली गोष्ट. पण आयोगाने हा नियम फक्त या निवडणुकीत का आणला? कायदा बदलला का?'
‘पाडू’ मशीनवरही त्यांनी संशय व्यक्त केला. 'ईव्हीएम (EVM) जुनी आहे म्हणून नवीन युनिट लावतो, पण ही ‘पाडू’ मशीन कोणती? राजकीय पक्षांना प्रात्यक्षिक दाखवले नाही. उद्धव ठाकरे यांचे पत्र आयोगाकडे गेले तरी सौजन्य नाही. हे वाघमारे सांगत नाहीत, सरकारने वाघ मारला का? ईव्हीएम बुथवर राजकीय प्रतिनिधींना बटन दाबून दाखवता, पण नवीन मशीन दाखवावी वाटली नाही?', असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरेंनी शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. 'उमेदवार लोकांकडे जात आहेत, पैसे वाटले जात आहेत हे लक्षात ठेवा. काय प्रकारचे राजकारण सुरू आहे, लोकांनी पाहावे. इतकी बेबंदशाही कधीच नव्हती', असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मनसे प्रमुखांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाने अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. मतदानाच्या पूर्वसंध्येवर ही चर्चा निवडणुकीला नवे वळण देईल का, याकडे लक्ष आहे.
