Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळताना मराठी संस्कृती विसरू नका; फक्त ढोल-ताशा आणि लेझीम वाजवावेत, राज ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यातील संयुक्त सभेत उद्योगपती आणि निवडणूक पैशावर खाणबाजोरीवर जोरदार हल्लाबोल केला. "माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण सगळे उद्योग एकाच उद्योगपतीकडे का? त्या माध्यमातून मराठी ठसा पुसण्याचं काम होत आहे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई विमानतळ अदानीने ताब्यात घेतल्यानंतर तेथे गरबा खेळला गेला, यावर टीका करत ते म्हणाले, "ही मुंबई आहे! वाजवायचं असेल तर ढोल-लेझीम वाजवा."
राज ठाकरे यांनी निवडणूक पैशावर खरेदीवरून भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागली. "भाजपवाले पैसे वाटतात आणि शिंदेंची माणसं पकडून मारतात. मताला पाच-पाच हजार रुपये वाटले जात आहेत. एका बाजूला विकास केला म्हणतात, मग पैसे का वाटावे लागतात? मला देणाऱ्यांची नाही, घेणाऱ्यांची चिंता आहे.
उद्या त्यांची मुलं म्हणतील, आमचे आई-वडील विकले गेले," असे म्हणत त्यांनी मतदारांना सावध केले. कल्याण-डोंबिवलीत "गुलामांचा बाजार" मांडला गेल्याचा आरोप करत ते म्हणाले, "एका बाजूला एबी फॉर्म गिळंकृत केले. सोलापूरात आमच्या उमेदवाराचा खून झाला, पोलीस हताश आणि कोर्ट तर विचारायलाच नको."
कल्याणमधील शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक या एकाच कुटुंबातील तिघांना १५ कोटींची ऑफर आली तरी त्यांनी नाकारली. राजश्री नाईक यांना ५ कोटी आणि सुशील आवटे यांना १ कोटीची ऑफर नाकारली. "कुठून येतो हा पैसा? इतकी वर्षे निवडणुका पाहिल्या, अशी पाहिली नाही. हे फक्त दोन-तीन जण समोर आले, पैसे कुठून येतात?" असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी मतदारांना जागृत केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची ठरली.
