Maharashtra Budget; राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान नेमक आहे काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021 मांडला. या अर्थसंकल्पात शैक्षणिक विभागासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच यासाठी 3 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. नेमके हे अभियान काय आहे ते जाणून घेऊयात.
राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आनंददायी वातावरण, द्विभाषिक पुस्तके, ग्रंथालये उभारणी, शारीरिक व क्रीडा विकास, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षांची दर्जेदार आयोजन कलचाचणी , डिजीटल शिक्षण, कौशल्य विकसित करण्यात येणार आहे.
स्टार्स योजना
राज्यातील शिक्षण पद्धतीची अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासाठी पूर्व प्राथमिक ते बारावी दर्जेदार शिक्षण देणे, अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, सामाजिक, लिंग भेदभाव न करता शिक्षणाचा दर्जा राखणे या सर्व बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करण्यात येणार असून विशेष गरजा असलेली बालके, मुली, आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
शिक्षकांचा विकास शाळेच्या वर्गातील अध्ययन पद्धतीत सुधारणा, शाळेचे नेतृत्व, शाळा ते काम / शाळा ते उच्च शिक्षण हे संक्रमण सुलभ करणे, प्रगत सेवा पुरवण्यासाठी प्रशासन व विकेंद्री व्यवस्थापन करणे अशा गोष्टी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. सदरच्या योजनेची अंदाजित किंमत 967 कोटी 39 लाख किंमतीच्या योजनेस अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली.
साताऱ्यातील सैनिक शाळेसाठी 300 कोटीची तरतूद
साताऱ्यातील सैनिक शाळेचे आधुनिकीकरण करण्यासाठी 300 कोटी चा विकास आराखडा तयार करण्यात आला असून सन 2021-22 च्या साठी 100 कोटी नियत व्यय मंजूर करण्यात आले. या विकास आराखड्यामध्ये मुलांचे दर्जेदार वसतीगृह, आधुनिक इमारती व दर्जेदार शारीरिक शिक्षणाचे क्रिडांगण व अन्य बाबींचा विकास करण्यात येणार आहे.
भारतरत्न राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी 'राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क' उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांसाठी गेल्या वर्षी 2000 कोटी वरून 2140 कोटींची तरतूद करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महाविकास आघाडीने महत्व दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.