सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारची भूमिका चुकीची, रामदास आठवले यांची टीका
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांची गाडी आढळल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सचिन वाझे यांना अटक केली आहे. याप्रकरणी सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारने चुकीची भूमिका घेऊन संशयास्पद असणाऱ्या सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
याप्रकरणी एनआयएने अत्यंत योग्य कारवाई केली असून या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असे रामदास आठवले म्हणाले. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सचिन वाझेला अटक करण्याची मागणी सुरुवातीपासून केली. मात्र राज्य सरकारने सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याचा चुकीचा प्रयत्न केला. असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात, असे आठवले म्हणाले.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी उभी करण्यात आली. या गाडीमागे असणारी इनोव्हा गाडी क्राइम ब्रॅंचमधील सचिन वाझे यांची होती, हे सत्य चौकशीत समोर आले आहे. त्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचीही हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात देखील सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.