उंदराने कुरतडले पेशंटचे डोळे… मुंबईतील सरकारी रुग्णालयात खळबळ
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होता. तसेच प्रकृती नाजूक असल्याने तो बेशुद्ध होता. यावेळी उंदराने त्याचे डोळे कुरतडले आहेत.
रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
डोळ्यांच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या सर्व गोष्टीची खातरजमा करत होतो तेव्हा लक्षात आलं की, हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार नसल्याची खबरदारी घेण्यात आली आहे. पण तळाला असल्याने आणि पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा. रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्याने निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्याने लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली. त्यामध्ये हे कृत्य उंदराने केल्याचे निष्पन्न झाले आहे.