Rohit Pawar : 'सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार'? रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका
(Bhushan Gavai) सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित नव्हते. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, देशातील न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा सन्मान न्या. भूषण गवई यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मिळत असेल तर ही आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा परिस्थितीत न्या. गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर राज्यात प्रथमच येत असतील तर त्यांचा यथोचित मानसन्मान राखणं ही राज्याची जबाबदारी असताना याचा राज्य सरकारला विसर पडणं हे लांच्छनास्पद आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'सरन्यायाधीशांच्या अवमानाची जबाबदारी राज्य सरकारला झटकात येणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेली व्यक्ती सरन्यायाधीशपदी येणं याचं तर दुःख सरकारला झालं नाही ना? अशी शंका येते आणि तसं नसेल तर सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.' असे रोहित पवार म्हणाले.