Rohit Pawar : 'मानहानीची एवढी काळजी होती तर...'; मानहानीच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
(Rohit Pawar) माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर विधानसभेतील माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी व्हिडिओ प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. 'माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही.
'तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल.' असे रोहित पवार म्हणाले.