Saamana Editorial : 'हा पूल नव्हे तर ‘गुजरात मॉडेल’ कोसळले आहे, हे आता तरी मान्य करा'; सामनातून टीका
(Saamana Editorial ) गुजरातमध्ये आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभीरा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ब्रिजचे दोन तुकडे झाले असून अनेक वाहने नदीमध्ये वाहून गेली. या पुलाची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याच पार्श्वभूमीवर आता सामनाच्या अग्रलेखातून यावर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, 'गाजावाजा झालेले विकासाचे गुजरात मॉडेल रोजच कोसळत आहे. पहलगामपासून दिल्लीपर्यंत हे कोसळणे सुरूच आहे, पण प्रत्यक्ष गुजरातमध्येही या मॉडेलचा तकलादूपणा समोर आला. वडोदरा-आणंदला जोडणारा पूल कोसळतानाचे ‘लाईव्ह’ चित्रण काल भारताने पाहिले. या पूल दुर्घटनेत ट्रक, टँकर, गाड्या वाहून गेल्या व दहापेक्षा जास्त लोक वाहून गेले. मोरबी पुलापासून आता वडोदरापर्यंत पुलाचे कोसळणे आणि वाहून जाणे सुरूच आहे. ते कमी म्हणून मध्यंतरी अहमदाबादेत एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यात 243 लोक ठार झाले. आता गुजरातचे सुपुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक दौऱ्यावर असताना ‘वडोदरा’ येथे पूल कोसळला. या वडोदराचे संसदीय नेतृत्व कालपर्यंत नरेंद्र मोदी करीत होते. आता ते वाराणसीचे खासदार आहेत. त्या वाराणसीच्या रस्त्यावरही ‘विहिरी’एवढे खड्डे पडले आहेत.'
'वाराणसीतही ‘गुजरात मॉडेल’चे स्वप्न दाखवून मोदी विजयी झाले. या स्वप्नाच्या ठिकऱ्या खुद्द गुजरातमध्येच उडाल्या. महीसागर नदीवरील पूल कोसळला. हा पूल जुना होता अशी सारवासारव सुरू आहे. पूल जुना होता. मग तो दुरुस्त का झाला नाही? खूपच जुना होता, तर नवीन का बांधला नाही? निरपराध माणसे या दुर्घटनेत मेली हे गुजरात मॉडेलवाल्यांना समजत नाही काय? हा प्रकार गुजरात सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. राज्यातील एक सर्वात उंच पूल थेट दोन तुकडे होण्याइतपत ‘धोकादायक’ झाला आहे याची पूर्वकल्पना सरकारला नव्हती किंवा असूनही बेपर्वाई दाखवली. जर पूर्वकल्पना असती तर पुलावरील वाहतूक बंद ठेवली गेली असती. मात्र तेथील सरकारचा सगळाच कारभार ‘गुजरात मॉडेल’च्या भरवशावर सुरू असल्याने वाहतूक सुरू राहिली आणि बुधवारी पुलासोबत हा भरवसादेखील तुटला. दुर्घटना सांगून होत नाही हे मान्य केले तरी ही पळवाट झाली. हा दुर्घटनाग्रस्त पूल मागील काही वर्षांत कमकुवत झाला आहे. त्यावरील वाहतूक धोकादायक ठरू शकते या स्थितीची कल्पना तेथील स्थानिक आमदाराला होती. त्यासाठी नव्या पुलाची मागणीही करण्यात आली होती. सरकारने म्हणे नवीन पुलासाठी 212 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे आणि सर्वेक्षणही झाले आहे. मग एवढे सगळे झाले होते तर घोडे अडले होते कुठे? पंतप्रधान मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’च्या असंख्य ‘परिकथा’ मागील अडीच दशकांपासून रंगवून सांगितल्या जात आहेत. त्या ‘परिकथां’चे रंग बुधवारच्या पूल दुर्घटनेने पुन्हा एकदा ओरबाडून काढले. तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्येच झालेल्या मोरबी येथील भयंकर पूल दुर्घटनेने गुजरात मॉडेलची पोलखोल केली होती. त्या वेळी दुर्घटनेचे खापर सत्ताधाऱ्यांनी पुलाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंपनीवर फोडले होते व हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मोरबी पूल दुर्घटनेत 141 पेक्षा जास्त निरपराध्यांचा बळी गेला होता. तो पूल 140 वर्षे जुना होता.'
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'आता कोसळलेला गंभीरा पूल तर 45 वर्षेच जुना होता, तरी तो दोन तुकड्यांत कोसळला. ब्रिटिशांनी बांधलेला मोरबीचा हलता पूल 140 वर्षे टिकला. मोदींच्या तथाकथित गुजरात मॉडेलने बांधलेल्या गंभीरा पुलाचे 45 वर्षांतच दोन तुकडे झाले! हे पाप गुजरात मॉडेलसाठी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱयांचेच आहे. उपयोग काय तुमच्या त्या 212 कोटी रुपयांच्या तरतुदीचा आणि सर्वेक्षणाचा? गुजरात मॉडेल हे इतरांपेक्षा वेगळे असते तर ‘तरतूद आणि सर्वेक्षणा’च्या कागदी घोड्यात हा कमकुवत पूल अडकला नसता व निरपराध्यांचे हकनाक बळी गेले नसते. गेल्या महिन्यात पुणे जिह्यातील कुंडमळा पूल ज्या सरकारी अनास्थेमुळे कोसळला, तीच सरकारी अनास्था तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी हलता पूल दुर्घटनेसाठी आणि आता वडोदऱ्यातील गंभीरा पूल कोसळण्याला कारणीभूत ठरली आहे. म्हणजे तुमच्या विकासाच्या बाता या वल्गनाच ठरल्या. ‘गुजरात मॉडेल’चे पायही मातीचेच निघाले. प. बंगालमधील एक पूल कोसळला होता तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी तेथील ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार धरले होते. ही दुर्घटना म्हणजे ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे, अशी संभावना केली होती. मग आता त्यांच्याच गुजरातमध्ये बुधवारी झालेल्या पूल दुर्घटनेबद्दल मोदी यांचे काय म्हणणे आहे? हीदेखील ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे, असे म्हणण्याचे धाडस मोदी दाखवतील का? मोदीजी, तुमचे गुजरात मॉडेल गंभीरा पुलाप्रमाणेच कमकुवत ठरले आहे. हा पूल नव्हे तर ‘गुजरात मॉडेल’ कोसळले आहे, हे आता तरी मान्य करा' असे सामनातून म्हटले आहे.