Saamana Editorial
Saamana Editorial

Saamana Editorial : माधुरी हत्तिणीविषयी जितकी आस्था दाखवली जातंय तशीच भूतदया इतर प्राण्यांविषयी दाखवणार नसाल तर...; सामनातून भाष्य

महादेवी हत्तीणीवरुन कोल्हापूरमधील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Saamana Editorial) महादेवी हत्तीणीवरुन कोल्हापूरमधील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नांदणी मठातील महादेवी हत्तीणी गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आल्यानं नागरिक संतापले आहेत.याच पार्श्वभूमीवर सामनातून भाष्य करण्यात आले आहे. सामनातून म्हटले आहे की, 'कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण महादेवी ऊर्फ माधुरीने देशात अनेकांना चटका लावला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले. एका वृद्ध हत्तिणीने रांगड्या आणि टर्रेबाज कोल्हापूरकरांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यामुळे ही माधुरी कोण यावर देशभरातून संशोधन सुरू झाले. चाळिसेक वर्षे ही माधुरी नांदणीच्या जैन मठात होती. मठातील सर्व धार्मिक कार्यांत सहभागी होती. तिथे येणाऱ्या भक्तांना ती प्रिय होती. मठातर्फे माधुरीची देखभाल होत होती, पण आता थकलेल्या माधुरीस विश्रांती व अधिक देखभालीची आवश्यकता असल्याचे ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने ठरवले. प्रकरण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले व न्यायालयानेही ‘पेटा’चे म्हणणे मान्य केले. अंबानी परिवार गुजरातच्या जामनगरमध्ये आजारी, वृद्ध प्राण्यांसाठी ‘वनतारा’ नावाचा एक उपक्रम चालवतो आहे. त्या वनतारात माधुरीस नेण्याचा प्रसंग आला तेव्हा संपूर्ण नांदणी गाव, कोल्हापूरकर वाटेत आडवे होऊन रडू लागले. माधुरीची वाट अडवू लागले. त्यांच्या आक्रोशाने माधुरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. चाळीस वर्षांचा सहवास, गणगोत सोडून जाताना माधुरीचे पाय उचलत नव्हते. त्यामुळे माधुरीस जबरदस्तीने गुजरातला नेले आहे काय? असा प्रश्न पडतो.'

'माधुरीस एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमात ढकलले गेले व त्यास कोल्हापूरकरांचा विरोध आहे. माधुरीसाठी हजारो लोक रस्त्यावर आले. ते धाय मोकलून रडले याचा अर्थ नांदणी मठातून तिला प्राण्यांच्या वृद्धाश्रमात पाठवण्याची आवश्यकता नव्हती. माधुरी वनतारातून परत कोल्हापूरला यावी यासाठी जनतेने आंदोलन, सह्यांची मोहीम सुरू केली. नांदणी मठ हा जैन धर्मीयांचा आहे व सध्या एकजात बहुसंख्य जैन बांधव हे भाजपचे समर्थक आहेत, पण माधुरी प्रकरणात जैन मुनी व धर्माचार्यांनी भाजपच्या नावाने इशारा दिला. आचार्य गुणधर नंदीजी महाराज यांनी संतापाने सांगितले की, ‘‘देवेंद्र फडणवीस, तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री आहात. तुमच्या जीवनाचा मी धिक्कार करतो. जो माणूस समाज, प्राणिमात्राचे अश्रू पुसू शकत नाही तो फार काळ आपले सरकार टिकवू शकणार नाही. तो सत्ताभ्रष्ट होईल. जीवनात फार प्रगती करू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस, तुम्ही अंबानींच्या मांडीवर बसून काम करीत आहात.’’ आचार्य गुणधर नंदीजी महाराज यांनी फडणवीस व त्यांच्या सरकारला अशा पद्धतीने शाप दिला व आपला संताप व्यक्त केला. जैन धर्मीय तसे संयमी व शांत, अहिंसक व धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, पण माधुरी हत्तिणीवरून हा समाज कमालीचा आक्रमक, संतप्त झाला व त्यांनी कोल्हापुरात रिलायन्स कंपनीचे ‘जिओ मोबाईल कार्ड’ परत करण्यासाठी मोठे आंदोलन उभारले. जनतेने मनात आणले तर रिलायन्स शेअर्सचा भाव खाली आणू असे लोकांनी सांगितले. इतर अनेक मार्गांनी कोल्हापुरातील जैन समाज माधुरी परत यावी म्हणून आंदोलन करीत आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली भागात जैन समाज म्हणजे मतदार मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे पुढारी माधुरीसाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे दाखवत आहेत. ही भूतदया असायलाच हवी. मात्र एरवी शेतकरी भुकेने, कर्जाने मरतो आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, बेरोजगारीमुळे तरुण वर्ग खंगला आहे. यावर कुणी अश्रू ढाळत नाहीत, पण माधुरी प्रकरणात राजकीय लाभ मिळावा म्हणून अनेकांची छाती दुःखाने फाटली आहे हे दिसते. अगदी प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्यात आले.'

'नांदणी मठातले लोकही लढत आहेत. नांदणी मठातील या माधुरीने ‘मठा’च्या मुख्य पुजाऱ्यावर डिसेंबर 2017 मध्ये हल्ला केला. माधुरीला इतर राज्यांतील धार्मिक उत्सवासाठी किमान पंधरावेळा महाराष्ट्राबाहेर पाठवण्यात आले. मोहरमच्या मिरवणुकीतही तिला फिरवण्यात आले. खरेखोटे ‘मठ’वालेच जाणोत. मधल्या काळात माधुरीचे संतुलन बिघडल्याने तिला उपचारांसाठी इतरत्र वन खात्याच्या ताब्यात दिले व त्यासाठी जैन धर्मीय शेतकरी पुढारी राजू शेट्टी यांची शिफारस होती. त्यात काहीच चुकीचे नव्हते. एखाद्या प्राण्यावर उपचार करणे, देखभालीसाठी योग्य ठिकाणी पाठवणे हीच प्राणिमात्रांच्या बाबतीत दयाबुद्धी आहे. अंबानींच्या ‘वनतारा’ प्रकल्पात देशभरातील अनेक आजारी, जखमी, वृद्ध प्राण्यांची काळजी घेतली जाते. हा प्रकल्प अंबानींचा आहे म्हणून त्यावर टीका करण्यात अर्थ नाही. 1883 मध्ये पारशी उद्योगपती सर दिनशॉ मानेकजी पेटिट यांनी मुंबईतील परळ येथे स्थापन केलेले एक बैलघोडा इस्पितळ आहे. प्राण्यांच्या देखभालीसाठीच हे इस्पितळ उभारले गेले. अनेक उद्योगपती आपल्या फायद्यातील काही वाटा प्राणिमात्रांच्या देखभालीसाठी खर्च करतात. टाटा समूहाने, वाडिया समूहाने हे काम अनेक वर्षे चालवले. आता अंबानी ते करीत असतील तर त्यावर दुगाण्या झाडण्यात अर्थ नाही. आजारी व जखमी हत्तींची काळजी घेणारे एक ‘नर्सिंग होम’ श्रीलंकेत आहे व तेथील कार्य पाहण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच आहे की, ‘पेटा’ने नांदणी मठाच्या माधुरीचा प्रश्न उचलून धरला व ही हत्तीण भूतदयेच्या नावाखाली अंबानींच्या वनतारात पाठवली. भारतात ‘पेटा’ला हे एवढेच काम उरले आहे काय? भारताच्या रस्त्यांवर, उकिरड्यांवर, शहरांत, गावांत भटकी कुत्री वाढली आहेत. त्यांना खाणं, पिणं मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर चालण्या-फिरणाऱयांना त्रास होतो. या भटक्या कुत्र्यांच्या संगोपनाची जबाबदारी ‘पेटा’ने व वनताराने घ्यायला हवी.

'रस्त्यावर बेवारस गायी, बैल मोकाट फिरतात. गायींना धड अन्न मिळत नाही. त्यांच्या पोटातून ‘प्लॅस्टिक’ निघते. गोशाळा निर्माण करून हिंदुत्वाचे राजकारण सुरूच असते, पण जनावरांना चारा-पाण्याअभावी तडफडावे लागते. या गायी, बैलांची काळजी माधुरीप्रमाणे ‘पेटा’ने घेऊ नये व वनताराने या प्राण्यांची सेवा करू नये याचे आश्चर्य वाटते. नांदणी मठातील माधुरी हत्तिणीविषयी जितकी आस्था दाखवली जात आहे तशीच भूतदया इतर प्राण्यांविषयी दाखवणार नसाल तर ‘माधुरी’बाबतचा खेळ हे नाटक आहे, असे मानावे लागेल. माणसाचे जगणे कठीण झालेय. गरिबी, भुकेपोटी माणूस माणसाला खातोय, मारतोय, लचके तोडतोय. याला जबाबदार सध्याचे ‘गुजरात पॅटर्नचे’ राज्यकर्ते आहेत. त्या गुजरात पॅटर्न सरकारला भरघोस मतदान करणारे नांदणी मठातील माधुरीसाठी रडत आहेत, लढत आहेत, शाप देत आहेत. माधुरीचे भाग्य 140 कोटी जनतेला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! माधुरी आज गुजरातला गेलीय. तिला महाराष्ट्रात आणण्यासाठी कोल्हापूरकर लढत आहेत. त्यांच्या लढ्यास शुभेच्छा'असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com