Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?
(Saamana Editorial ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा आज 5 तारखेला होणार आहे. या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. सामनातून म्हटले आहे की, 'महाराष्ट्राच्या भूमीवर, मुंबई नगरीत मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होत आहे. मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे कमीच येतात. दिल्लीत सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूंनी प्रहार सुरूच आहेत. महाराष्ट्राची, मराठी जनांची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत. अशा स्थितीत दिल्लीश्वरांनी लादलेले हिंदी सक्तीचे फर्मान उधळून मराठी माणसाने मराठी म्हणून विजयाचा एल्गार केला आहे. मराठी भाषेला शेपूट म्हणून हिंदी चिकटवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या एकीने हाणून पाडला. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी एक झाले. त्या ऐक्यात तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते अर्थात ‘ठाकरे’ भाऊ! उद्धव आणि राज ठाकरे हे 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरोधी मोर्चात आपल्या फौजफाट्यासह एकत्र येत आहेत व त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर अस्सल मराठी राडाच होईल या भयाने सरकारने महाराष्ट्रावर लादलेली हिंदी सक्ती रद्द करीत असल्याचे जाहीर केले. मराठी माणसे एकत्र आली की, काय चमत्कार घडतो त्याचे हे उत्तम उदाहरण. वरळीच्या भव्य सभागृहात यानिमित्ताने मराठी जनांचा विजयोत्सव साजरा होत आहे. खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठे सभागृह पेलणार नाही. त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते. लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा, मराठी जनांनी आपला प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडवले, पण सध्याचे ‘मिंधे’-फडणवीस सरकार मराठी विजय उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही. त्यामुळे आजचा विजय सोहळा शिवतीर्थावर होऊ शकत नाही. अर्थात, तरीही मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलेच आहे. जणू स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मराठी जनांना ‘चलो वरळी’चे आवाहन करीत आहेत.'
'आज मराठी जनांची स्थिती ही कोंडीत सापडलेल्या वाघासारखी झाली आहे. मराठी जनता महाराष्ट्र राज्यातच असली तरी तिला त्राता-पिता कोणीच नाही, अशी वास्तव अवस्था आहे. वरवर पाहता सर्व काही आमचेच आहे असे दिसते, पण किंचित खोलवर डोकावून पाहता आमचे हक्काचे, न्यायाचे असे कोणीच नाही. महाराष्ट्रावरील, मराठी माणसावरील अन्यायाचा, अपमानाचा अथवा अवहेलनेचा कोणताही सवाल असो, तो लागलीच ‘राष्ट्रीय’ संदर्भाच्या सबबीखाली दाबून टाकण्यात येतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हौतात्म्य आणि रक्ताचा अभिषेक झाल्याशिवाय महाराष्ट्राची एकही मागणी पदरात पडलेली नाही. राज्यकर्ते कोणीही असोत, मुंबईची भरमसाट लूट करायची हे धोरण ठरलेलेच आहे. केंद्रीय दिल्लीवाल्यांचा महाराष्ट्राविषयीचा आकस ही इतिहाससिद्ध बाब सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रातले मोठे नेते दिल्लीत जाऊन बसले, पण एक चिंतामणराव देशमुख सोडले तर दुसऱ्या पुणालाच ही द्वेषाची आणि आकसाची नांगी मोडता आली नाही किंवा बोथट करता आली नाही. महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा हातोडा पडला असता दिल्लीतील किती केंद्रीय मंत्र्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला? किती जणांनी निषेध केला? याचे उत्तर शून्यातच द्यावे लागेल. परिस्थिती तापली, सहन होईनाशी झाली, हाका आरोळ्या मारूनही पाठिंब्याला कुणी धावेना असे झाले की, कोठेतरी स्फोट व्हायचाच. तो साक्षात ब्रह्मदेवालाही टाळता यायचा नाही. त्यात हा शिवरायांचा महाराष्ट्र व मराठी माणूस तर जात्याच बंडखोर. ही बंडखोर वृत्ती आणि मराठीचा अभिमान जोपर्यंत आमच्या धमन्यांत सळसळत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणात नाही. मराठी भाषेला, अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे (मिंधे) यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून ‘जय गुजरात’चा नारा दिला. हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत उघडपणे एकाही मंत्र्याने महाराष्ट्रात राहून ‘जय गुजरात’चा नारा दिला नव्हता. तो या शाह सेनावाल्यांनी दिला.
'केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही व मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो!' असे सामनातून म्हटले आहे.