Saamana : 'मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य घृणास्पद मानसिकता दाखविणारे'

Saamana : 'मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य घृणास्पद मानसिकता दाखविणारे'

कर्नल सोफिया कुरेशींविरोधात (colonel Sofiya Qureshi ) वादग्रस्त वक्तव्य करणं मंत्री विजय शाह (MP Minister Vijay Shah ) यांना चांगलेच भोवलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कर्नल सोफिया कुरेशींविरोधात (colonel Sofiya Qureshi ) वादग्रस्त वक्तव्य करणं मंत्री विजय शाह (MP Minister Vijay Shah ) यांना चांगलेच भोवलं आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर भाजपच्या मंत्र्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना भाजपचे मंत्री विजय शाहांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इंदुरच्या मानपूर ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता 'सामना'च्या अग्रलेखातून विजय शाहांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, 'पाकिस्तानविरोधात शौर्य गाजविणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीचा राजकीय फायदा घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा घृणास्पद चेहरा चार दिवसांत दोनदा उघड झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ‘तिरंगा यात्रा’ काढून नौटंकी केली आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा निर्लज्ज प्रकार केला. त्यापाठोपाठ भाजपचे मध्य प्रदेशचे एक मंत्री कुंवर विजय शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरली. कर्नल सोफिया कुरेशी हे नाव देश आणि जगाला माहिती झाले ते ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रोजच्या बुलेटीनच्या निमित्ताने. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे तिघे एक कौतुकप्राप्त चेहरा बनले होते.'

'या सर्वांबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली होती, मात्र याच कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’ अशा अश्लाघ्य शब्दांत करण्याचा नतद्रष्टपणा मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शाह यांनी एका सभेत बोलताना केला. त्यावरून शाह यांच्याविरोधात टीकेचा गदारोळ उठल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही ‘गिरे तो भी उपर’ हीच भावना होती. ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे’ अशा उफराट्या शब्दांत या मंत्री महाशयांनी आपणच केलेली घाण साफ करण्याचा आव आणला. म्हणजे त्यातही थेट माफी मागून चूक कबूल करण्याचा हेतू नव्हता. बरं, या महाशयांना या वक्तव्यावरून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फटकारले. चार तासांत त्यांच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्याचा आदेशच उच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिला. एवढे झाल्यावर तरी या महाशयांनी वठणीवर यायचे, पण नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हे निर्लज्ज मंत्री सर्वोच्च न्यायालयात धावले, मात्र तेथेही त्यांना अपेक्षेप्रमाणे फटकेच मिळाले. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे. तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्ये करीत आहात?’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मंत्री शाह यांची पिसे काढली.

'सर्वोच्च न्यायालयाचे हे कडक ताशेरे म्हणजे शाह आणि त्यांच्या पक्षाच्या इभ्रतीचा जाहीर पंचनामाच आहे. बरं, एवढे सगळे होऊनही ना स्वतः विजय शाह काही बोलत आहेत, ना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, ना कर्नल सोफिया कुरेशी यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपविणारे मोदी सरकार. असेच एखादे वक्तव्य विरोधी पक्षाच्या सरकारमधील मंत्र्याने केले असते तर स्वतःला नैतिकतेचे स्वयंघोषित ठेकेदार समजणाऱ्या भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून कंठशोष केला असता. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पिलावळीने उच्छाद मांडला असता, मात्र आता भाजपचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासारख्या देशभक्त सैन्याधिकाऱ्याबद्दल अपशब्द काढूनही दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे भाजपवाले थोबाड बंद करून बसले आहेत. ना मंत्री स्वतः बिनशर्त माफी मागत आहेत, ना त्यांचा पक्ष त्यांना तसा आदेश देत आहे, ना त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करीत आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शाह यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्येदेखील गडबड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उच्च न्यायालयानेच त्याविरोधात असंतोष व्यक्त केला आहे आणि एफआयआरमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेले अश्लाघ्य वक्तव्य त्यांची घृणास्पद मानसिकता दाखविणारे आहे. उठता बसता नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा बुरखा टराटरा फाडणारे आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ‘थप्पड’ देऊनही मंत्री शाह आणि त्यांचा पक्ष कोडगेपणाच दाखवीत आहेत. कर्नल सोफिया कुरेशीविरुद्ध धर्मांध अपशब्द वापरणे हा संपूर्ण भारतीय सेनादलाचा अपमान आहे. असा अपमान करणारे लोक तिरंगा यात्रेचे ढोंग करतात. कर्नल सोफियाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या विजय शाहची मंत्रीपदावरून आणि भाजपमधूनही हकालपट्टी व्हायलाच हवी. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com