26 प्रकरणं दिली, चौकशी व्हावी; नवाब मलिक यांची मागणी
आर्यन खान प्रकरणात रोज नवे आरोप होत असून प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 'एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही जण फर्जीवाडा करून नोकरी मिळवतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आमची लढाई एनसीबीबरोबर नाही, मी कधी धर्मावर राजकारण केले नाही. खूप गोष्टी समोर आल्या, आम्ही कोणाच्याही कुटुंबियांना बदनाम केले नाही. जन्माचा दाखला जो ट्वीट केला आहे तो खरा आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवली आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याकडून पत्र मिळाले आहे. मला मिळालेलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. २६ प्रकरणात एनसीबीची चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे.
समीर वानखेडे यांचा मी दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. बारकाईनं पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जन्माचे दाखले ऑनलाइन सहज मिळतात. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन उपलब्ध आहे. पण वानखेडे यांचं सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केलं. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्मानं दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं. त्याच आधारे नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिमाप्रमाणे जगत होतं हे वास्तव आहे. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या साह्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला. याबाबत विविध दलीत संघटना माझ्या संपर्कात आहेत. आम्ही हे प्रमाणपत्र जातवैधता समितीसमोर सादर करणार आहोत. वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. सत्य लोकांसमोर येईल,' असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.