सध्या गोव्याची सत्ता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हातात; राऊतांनी सोडले टीकास्त्र
देशभरातील पाच राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आता पहायला मिळतंय. आगामी गोवा निवडणूकांसदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत ह्यांनी माध्यामांसमोर आपली भुमिका स्पष्ट केली.
तृणमूल काँग्रेस व आम आदमी पार्टी विषयी बोलताना ते म्हणाले, "तृणमूल काँग्रेस मनानं सत्तेवर आलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांचा वावर आहे. असू द्या, आम आदमी पार्टीचंही तसंच दिसत आहे. त्यांना केवळ शपथ घेणंच बाकी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री काल गोव्यात दारोदारी प्रचार करत होते. दिल्लीत तर कोरोना एवढा वाढत आहे आणि इथे दारोदारी जात आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार सांगा, जेव्हा ते स्वत: दारोदार जात होते, तेव्हा मी स्वत: त्यांना पाहिलं आहे. चांगली गोष्ट आहे आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत, परंतु पाहुयात गोव्यात काय होतंय."
गोव्यात शिवसेनेकडून उमेदवारी कोणाला दिली जाईल ह्याविषयी बोलताना ते म्हणाले, ""गोव्यातील सामान्य लोकाना प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेलं आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रं आहेत आणि ते गोव्याचं भविष्य ठरवतात. हे जर मोडायचं असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकांना निवडणुकीत मतदान करावं आणि निवडून आणावं. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी, उमेदवारी देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केलं. गोव्यात हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू."
"राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र नाही होऊ शकलं. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही." गोवा विकास आघाडी बद्दल बोलताना त्यांनी अशी भुमिका स्पष्ट केली.
"गोव्याचं राजकारण जर तुम्ही पाहिलं. तर मोजके दहा-बारा लोकच गोव्याचं राजकारण करतात. तेच कधी या पक्षात असतात तर कधी त्या पक्षात असतात, तेच ठरवतात गोव्याचं भविष्य. त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर भूमाफिया आहेत, ड्रग्ज माफिया आहेत आणि कोणत्याही पक्षात कोणी चांगलं नाही. तुम्ही पाहा भाजपात अशातच जे लोक गेलेले आहेत, ज्यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. भ्रष्टाचाराने तर या लोकाचं जुनं नातंच आहे. तर आम्हाला असं वाटतं की गोव्याच्या जनतेने यंदा अशा लोकाना निवडून द्यावं, जे सामान्य व्यक्ती आहेत. सामान्य नागरिक आहेत जे निवडणूक लढवतील. तर आम्ही असे उमेदवार देऊ जे लोकांमधून असतील, जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं." अशी भुमिका त्यांनी मांडली.

