Sanjay Raut : काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात
'मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार'
भाई जगताप यांचा मुंबईत स्वबळाचा नारा
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
(Sanjay Raut) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळाचा नारा दिला असून याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाई जगताप म्हणाले होते की, "राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना 'डंके की चोट' ही गोष्ट सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही आम्ही ही गोष्ट रमेश चेन्निथला यांना सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या नाही." असे भाई जगताप म्हणाले.
यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, " कोण काही बोलतंय त्याच्यावर मी आता मत व्यक्त करणार नाही. काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीतला आमचा मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही किंवा निर्माण झाला नाही. काँग्रेसबरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत. म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण झाला. आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारे कोणतेही विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही."
"राज ठाकरे मनसेचं प्रमुख आहेत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे कोणी ही भूमिका घेत असेल तर तो ही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यातसुद्धा सर्व पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे. मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता. त्यात सर्व मतभेद विसरुन सर्व पक्ष एकत्र आले होते. आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? काँग्रेसचं आणि तेजस्वी यादवचं वाजलंय आणि आणि वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत."
यासोबतच ते पुढे म्हणाले की," बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत. तिथे काय उद्धव ठाकरे, राज ठाकरे आहेत का? आम्हाला हे ही नको आणि ते ही नको. ठीक आहे एका दिवसाची प्रसिद्धीची वाक्य असतात ती. मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. म्हणून काँग्रेस पक्षाच्या मराठी नेतृत्वाने पुढचे मुंबईवरचे जे संकट आहे त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला जर काही बोलायचे असेल तर आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत बोलू. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलू, वेणूगोपाल, रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे." असे संजय राऊत म्हणाले.
