Sanjay Raut : "कायद्याचं भय नष्ट झालंय"; फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
थोडक्यात
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या
फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
"महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा बोजवारा उडालाय"
( Sanjay Raut ) सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या घटनेत धक्कादायक बाब समोर आली असून, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोन व्यक्तींची नावे लिहिली आहेत.
मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, "PSI गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला". त्या महिला डॉक्टरने या दोघांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की," महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे. भय कसं नष्ट झालं आहे कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृहखातं, कायदा, सुव्यवस्था यांच्या राहिलं नसून पूर्ण राजकारण. ते ही विरोधीपक्षाच्या पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थान करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल. त्यातच त्यांनी संपूर्ण पोलीस खात अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या."
"फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करावी लागली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहेत ते पोलीस खात्यातले आहेत." असे संजय राऊत म्हणाले.
