विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Published by :
Published on

"महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे 'मोठे' किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे.

त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते 'सरशी'वाल्यांनी सांगावे," असा टोला शिवसेनेनं लगावला आहे

"महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपाने आपली ताकद दाखवली आहे. भाजपाने २२ जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपाने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण १०५ आमदार असलेला भाजपा आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही," असा टोला लेखामधून लगावण्यात आलाय.

फडणवीस काय म्हणाले होते?
"या निवडणुकीत भाजपानं निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते तीन पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे", असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com