Sanjay Sirsat : गुवाहाटीतील किस्सा सांगताना शिरसाटांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीबाबत केला धक्कादायक खुलासा
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना बंडखोरीचा किस्सा उलगडताना आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. बंडखोरीच्या काळात कल्याणकर आमच्यासोबत असले तरी ते अत्यंत नाराज होते, असे शिरसाट यांनी सांगितले.
पुढे संंजय शिरसाट म्हणाले, “बंडखोरीच्या काळात बालाजी कल्याणकर आमच्यासोबत होते. मात्र त्या काळात ते खूपच तणावाखाली होते. आमदारकी रद्द होईल, मतदारसंघात काय होईल ? याचाच विचार ते करत होते. इतके की त्यांनी जेवण देखील सोडलं होतं. एकदा तर त्यांनी ‘हॉटेलवरून उडी मारतो’ असंही म्हटलं होतं,” असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
या वेळी शिरसाट यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीबाबतही संकेत दिले. “मी निश्चित राजकारणातून निवृत्त होणार आहे,” असे सांगत त्यांनी पुढील काळात सक्रिय राजकारणातून दूर होण्याचे संकेत दिले. शनिवारी नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाजाकडून आयोजित नागरी सत्कार समारंभात शिरसाट बोलत होते.

