Omicron Varient | साताऱ्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; दक्षिण आफ्रिकेतून फलटणला तिघांना लागण
सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून फलटण येथे आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन लहान मुले कोरोना बाधित आढळली होती. या कुटुंबाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, या कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले असून फलटण शहरात विविध उपाययोजना राबवण्यात सुरुवात केली आहे.
पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून चार जण फलटण शहरात ११ डिसेंबर रोजी आले होते. प्रशासनाला याची माहिती मिळताच प्रशासनाकडून दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. १३ तारखेला त्यांचा शोध लागल्यावर पालिकेअंतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य सुविधा केंद्रात या चार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय फलटण याठिकाणी स्वतंत्र कक्षात विलगीकरण केले आहे.