Satara Sahitya Sammelan: साताऱ्यात ३२ वर्षांनी भरणार साहित्य मेळा, ९९ व्या साहित्य संमेलनाला साताऱ्यात आजपासून सुरूवात
मराठी साहित्याच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या सातारा शहरात तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साहित्याचा महासोहळा रंगणार आहे. गुरुवार, दि. १ जानेवारीपासून चार दिवस चालणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे सातारा शहर पुन्हा एकदा साहित्यिक, रसिक आणि पुस्तकप्रेमींच्या गजबजाटाने भरून जाणार आहे. शब्द, विचार आणि संस्कृतीचा उत्सव अनुभवण्याची संधी या निमित्ताने सातारकरांसह राज्यभरातील रसिकांना मिळणार आहे.
हे संमेलन केवळ एक साहित्यिक कार्यक्रम नसून, साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि साहित्यिक वारशाचा पुनर्जन्म म्हणावा लागेल. विशेष बाब म्हणजे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जबाबदारी आहे. १९९३ साली झालेल्या ६६ व्या साहित्य संमेलनात त्यांचे वडील दिवंगत अभयसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष होते. पित्यानंतर पुत्राकडे सारस्वतांचे स्वागत करण्याचा मान येणं, हा साताऱ्याच्या साहित्य इतिहासातील एक दुर्मीळ आणि भावनिक योगायोग ठरतो.
सातारा साहित्य संमेलनांचा समृद्ध वारसा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनात सातारा जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. येणारे ९९ वे संमेलन हे सातारा शहरातील चौथे, तर संपूर्ण जिल्ह्यातील सातवे संमेलन ठरणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली असून, त्यामुळे साहित्यिक वर्तुळात विशेष उत्सुकता आहे.
सातारा शहरात पहिल्यांदा साहित्य संमेलन १९०५ साली भरले होते. हे संमेलन एकूण मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासातील तिसरे संमेलन होते, ही बाब साताऱ्याच्या साहित्यिक योगदानाची साक्ष देणारी आहे. त्यानंतर १९६२ मध्ये ४४ वे, १९९३ मध्ये ६६ वे संमेलन सातारा शहरात पार पडले. कऱ्हाड येथे १९७५ मध्ये ५१ वे आणि २००३ मध्ये ७६ वे संमेलन झाले, तर २००९ मध्ये महाबळेश्वर येथे ८२ वे साहित्य संमेलन भरले होते. असा सातारा जिल्ह्याचा साहित्यिक प्रवास गौरवशाली आणि अभिमानास्पद राहिला आहे.
‘राजें’कडे पुन्हा स्वागताध्यक्षपद
१९९३ च्या ६६ व्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विद्याधर गोखले अध्यक्ष होते आणि अभयसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष होते. आज ३२ वर्षांनंतर, त्याच शहरात होणाऱ्या ९९ व्या संमेलनात शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष म्हणून पुढे येत आहेत. वडील आणि पुत्र या दोघांनाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान मिळणं, हा साताऱ्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील एक दुर्मीळ योगायोग मानला जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही वेळा ते मंत्री होते/आहेत, ही बाबही या संमेलनाला वेगळं परिमाण देते.
अध्यक्षाविना पार पडलेलं दुर्मीळ संमेलन
सातारा जिल्ह्याच्या साहित्य इतिहासात एक वेगळी नोंद २००९ च्या महाबळेश्वर साहित्य संमेलनाने केली. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष संमेलन अध्यक्षाविना पार पडलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात अध्यक्षाविना पार पडलेलं हे एकमेव संमेलन ठरलं, आणि म्हणूनच ही घटना आजही दुर्मीळ मानली जाते.
साहित्याचा उत्सव, विचारांचा संवाद
आगामी चार दिवसांत विविध साहित्यिक चर्चासत्रे, कवीसंमेलने, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सातारा शहर विचारमंथनाचं केंद्र ठरणार आहे. ९९ वं साहित्य संमेलन हे केवळ संख्येपुरतं महत्त्वाचं नाही, तर शतकी संमेलनाच्या उंबरठ्यावर उभं असलेलं हे संमेलन मराठी साहित्याच्या वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. साताऱ्यात पुन्हा एकदा साहित्याचा झेंडा फडकणार आहे. शब्दांची ही यात्रा, विचारांची ही मेजवानी आणि परंपरेचा हा वारसा यामुळे सातारा पुन्हा एकदा मराठी साहित्याच्या नकाशावर केंद्रस्थानी येणार, यात शंका नाही.
