School Bus Strike : उद्यापासून राज्यातील स्कूल बस चालकांचा बेमुदत संप
राज्यातील स्कूल बस चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली असून यामुळे आता शाळेतील मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
2 जुलै म्हणजे उद्यापासून राज्यातील स्कूल बस चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. सरकारचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही हा संप पुकारत असल्याचे यावेळी स्कूल बस चालकांनी सांगितले. वाहतूक नियम, दंड आणि ई-चलन या कारणांमुळे हा संप पुकारण्यात आला आहे. शालेय वाहतूक करत असताना स्कूल बस चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकारचे सातत्याने आमच्यकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
शाळेजवळ मुलांना घेण्यासाठी थांबलेले असताना सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून आणि वाहतूक पोलिसांकडून मनमानी पद्धतीने ई-चलन जारी केले जाते. स्कूल बस विरुद्ध अश्या प्रकारचे प्रलंबित ई-चलन माफ करावे आणि यासंदर्भातील निर्णयावर स्थगिती आणावी. पिकअप ड्रॉप झोन निश्चित करावा, संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करावी अशा प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्यातील स्कूल बस चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र राज्यातील स्कूल बस चालकांनी अशाप्रकारचा बेमुदत संपाचा निर्णय घेतल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.