PSI
PSI PSI

PSI भरतीसाठी वयोमर्यादा सवलतीची मागणी; शरद पवारांचे विद्यार्थ्यांना आश्वासन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी भरती जाहीर केली आहे. मात्र ही भरती उशिरा निघाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत चालली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी भरती जाहीर केली आहे. मात्र ही भरती उशिरा निघाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत चालली आहे. या अडचणीबाबत काही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने सांगितले की, “संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी वयोमर्यादेत सवलत मिळावी, यासाठी आम्ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून सरकारकडे सातत्याने विनंती करत आहोत. पण अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.” ही माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लवकर निर्णय घ्यावा आणि उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नये.

सरकारने पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वरून थेट 35 वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागातील PSI पदासाठी केवळ एक वर्षाची सूट देण्यासाठी इतका उशीर का होत आहे, असा सवाल उमेदवारांकडून केला जात आहे. त्यामुळे PSI पदासाठी तातडीने एक वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी, ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

महत्त्वाचे म्हणजे PSI भरतीची जाहिरात तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाली. तसेच वयोमर्यादा मोजण्याची तारीख 1 नोव्हेंबर 2025 ठरवण्यात आल्यामुळे, काही दिवसांच्या फरकाने हजारो उमेदवारांची शेवटची संधी हुकत आहे. म्हणून वयोमर्यादा ठरवताना 1 जानेवारी 2025 ही तारीख ग्राह्य धरावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व मागण्या योग्य असून शासनाने त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान, एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) 2025 अंतर्गत एकूण 674 जागा जाहीर करण्यात आल्या असून त्यापैकी 392 जागा PSI पदासाठी आहेत. या परीक्षेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाची विशेष संधी द्यावी, अशीही मागणी पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या दबावामुळे वयाच्या सवलतीबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com