Thackeray Bandhu : ठाकरे बंधूच्या भेटीवर भेटी; उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर, कारण आले समोर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत. ही भेट कोणत्याही राजकीय हेतूसाठी नसून, राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. ठाकरे कुटुंबातील या भेटीला पूर्णपणे कौटुंबिक रंग असल्याचे दिसून आले.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींची मालिका सुरु आहे. ही त्यांची गेल्या काही दिवसांतील आठवी भेट असल्याचे समजते. मराठी भाषेच्या प्रश्नावर दोघे 5 जुलै रोजी एका व्यासपीठावर आले होते, त्यानंतर अनेक प्रसंगी दोघांमध्ये संवाद झाला. विशेष म्हणजे, राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले होते.
सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र दिसत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अद्याप दोन्ही पक्षांनी राजकीय युतीची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी, कौटुंबिक संवादांमुळे राजकीय समीकरणांमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत. दरम्यान, मनसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मतदार यादीतील अनियमिततेविरोधात 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही ठाकरे कुटुंबे एकत्र आली होती. आता या नव्या भेटीने पुन्हा ठाकरेबंधुंमधील कौटुंबिक उब आणि संवादाचा धागा अधिक मजबूत झाला आहे.

