“देशातील गरीब-श्रीमंत दरी वाढली, गरीब अधिक गरीब तर श्रीमंत झाले गडगंज”; शिवसेनेचा भाजपाला टोला

“देशातील गरीब-श्रीमंत दरी वाढली, गरीब अधिक गरीब तर श्रीमंत झाले गडगंज”; शिवसेनेचा भाजपाला टोला

देशामधील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या 'ऑक्सफॅम'च्या अहवालाची सविस्तर आकडीवारी सादर करत शिवसेनेनं सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. "सालाबादप्रमाणे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी 'ऑक्सफॅम' या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यातून जगातील गरिबी आणि श्रीमंतीचे तेच भयाण चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. भारतात विकासाचे आणि अर्थचक्र सुरळीत झाल्याचे ढोल पिटले जात असले तरी आपल्याकडील परिस्थिती जगापेक्षा वेगळी नाही. गरीब अधिक गरीब होत आहेत आणि श्रीमंत अधिक गडगंज," असं शिवसेनेनं या अहवाला संदर्भ देत म्हटलंय.

देशातील ८४ टक्के जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. चार कोटींपेक्षा जास्त लोक दारिद्रयरेषेखाली ढकलले गेले आहेत. अब्जाधीशांची संख्या मात्र १०२ वरून १४२ वर पोहोचली आहे, असं म्हणत भाजपाच्या कार्यकाळात आर्थिक विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. इतकच नाही तर या वाढलेल्या आर्थिक विषमतेचा 'विकासाची भरजरी वस्त्रे' चढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा चिमटाही शिवसेनेनं काढलाय.

"'ऑक्सफॅम'च्या ताज्या अहवालानुसार २०२१ मध्ये भारतातील सुमारे ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. त्याच वेळी देशातील अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४२ एवढी झाली आहे. म्हणजे या वर्षभरात ४० नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ या काळात भारतीय अब्जाधीशांची संपत्ती २३.१४ लाख कोटी होती. ती आता ५३.१६ लाख कोटी रुपये झाली आहे आणि देशाच्या ४० टक्के संपत्तीचे मालक हे १४२ अब्जाधीश झाले आहेत.

चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा सर्वाधिक अब्जाधीश असलेला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. त्याच वेळी याच कालावधीत देशातील ४.६ कोटी जनता दारिद्रयरेषेखाली ढकलली गेली आहे. म्हणजे कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका देशातील सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय, नोकरदार तसेच हातावर पोट असलेल्या वर्गालाच बसला आहे. छोट्या-मध्यम उद्योगांनाही हा तडाखा बसला; पण मोठे उद्योग, अतिश्रीमंत यांना त्याचा फारसा फरक पडलेला नाही. अनेक कंपन्या बंद झाल्या, लाखोंचे रोजगार बुडाले, पण काही उद्योजकांची संपत्ती कमालीची वाढली. असा हा विचित्र विरोधाभास आहे," असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखामध्ये म्हटलंय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com