Mumbai Goa Highway : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गासह 'या' मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय
(Mumbai Goa Highway) किल्ले रायगडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काही मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत.
ही वाहतूक अधिसूचना मुंबई-गोवा महामार्ग, माणगाव-निजामपूर-पाचाड मार्ग आणि महाड-नातेखिंड-पाचाड मार्ग यांना लागू आहे. 5 जून सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जून रात्री 10 वाजेपर्यंत या मार्गांवर 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेची ट्रक, कंटेनर, ट्रेलर, मल्टी-अॅक्सल वाहने तसेच रेती व खनिज वाहतूक करणारी अवजड वाहने पूर्णतः बंद राहतील. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या काळात गडावर होणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास सुकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहनचालक व वाहतूकदारांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.