Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरेंची संजय राऊतांबरोबर फोनवरुन झाली 'ती' चर्चा, म्हणाले, "एकत्र येणं योग्य ठरेल..."
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने एकत्र येत 5 जुलैला संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमांसमोर मांडला.
संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांनी 6 जुलैला मोर्चाची घोषणा केली होती, तर शिवसेनेने 7 जुलैसाठी एल्गार नियोजित केला होता. मात्र, मराठीसाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र येणं योग्य ठरेल, असं मत राज ठाकरेंनी राऊतांना फोनवरून कळवलं. त्यानंतर राऊतांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनीही तात्काळ सहमती दर्शवून एकत्र मोर्च्याला मान्यता दिली.
5 जुलैला मराठीसाठी एकत्र मोर्चा निघेल, असा निर्णय झाला असून, यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नसणार आहे. ना कोणताही पक्षाचा झेंडा असणार आहे, केवळ ‘मराठी भाषा’ हाच एकमेव मुद्दा असेल. मोर्चाची वेळ आणि मार्ग याबाबत दोन्ही पक्षांमध्ये लवकरच अंतिम चर्चा होणार आहे.
संजय राऊत म्हणाले की, "मराठी माणूस एकत्र यावा, याच हेतूने हा निर्णय घेतला गेला आहे. मराठीसाठी लढताना आम्ही एक आहोत. कोणतीही फूट नाही." राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असली, तरी सध्या लक्ष केवळ मराठी भाषेवर केंद्रित आहे.