BJP Crisis
BJP SUFFERS TOTAL ROUT IN TASGAON AS ENTIRE PANEL LOSES DEPOSITS

BJP Crisis: महाराष्ट्रात भाजपची घोडदौड, पण तासगावमध्ये अपयशाचा धक्का; भाजपच्या संपूर्ण पॅनलचं डिपॉझिट जप्त, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: महाराष्ट्रभर यश मिळवत असलेल्या भाजपला तासगाव नगरपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्रभर भाजपने नगरपालिकांच्या निवडणुकांत चांगली कामगिरी करत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं असताना, सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपरिषद निवडणुकीत मात्र भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची अभूतपूर्व नामुष्की भाजपवर ओढवली असून, या निकालामुळे पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून लढवण्यात आलेल्या संपूर्ण पॅनलला मतदारांनी नाकारले, इतकेच नव्हे तर आवश्यक मतांची टक्केवारीही न गाठल्याने सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राज्यभरात भाजप सत्तेचा झंझावात असताना, तासगाव ही राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली, जिथे भाजपच्या अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त झालं.

गटबाजी आणि डावलण्याचे आरोप

या पराभवामागे पक्षातील अंतर्गत मतभेद, संघटनात्मक विस्कळीतपणा आणि स्थानिक नेत्यांना डावलण्याची भूमिका कारणीभूत ठरल्याचा आरोप खुद्द भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. विशेषतः भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

तासगाव तालुक्यात शहर मंडल आणि ग्रामीण मंडल अशी स्वतंत्र संघटनात्मक रचना असतानाही, ग्रामीण मंडलचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी शहरातील नगरपालिका निवडणुकीत थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. शहर मंडलची संघटना, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवारी वाटप व प्रचाराची दिशा ठरवण्यात आल्याने असंतोष वाढला.

निधी वाटपावरही प्रश्नचिन्ह

फक्त संघटनात्मक हस्तक्षेपच नव्हे, तर पक्षाकडून मिळालेला निवडणूक निधी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला गेला नाही, असा गंभीर आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रचार यंत्रणा कमकुवत राहिल्याने आणि समन्वयाचा अभाव असल्याने भाजपची संपूर्ण पॅनल मतदारांपर्यंत पोहोचू शकली नाही, असेही सांगण्यात येत आहे.

राजीनामा किंवा हकालपट्टीची मागणी

या दारुण पराभवानंतर भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून, तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या राजीनाम्याची किंवा थेट हकालपट्टीची मागणी होत आहे. तासगावमधील भाजप पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?

तासगावमधील हा निकाल भाजपसाठी केवळ पराभव नसून, पक्षांतर्गत व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणारा इशारा मानला जात आहे. आता या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात, दोषींवर कारवाई होते का, की संघटनात्मक फेररचना केली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com