Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj Palkhi

Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, देहूनगरी सजली

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी आज दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Sant Tukaram Maharaj Palkhi ) जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी आज दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी एकादशीला भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत लाखो वारकरी दाखल होत असतात.

19 दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा 6 जुलै रोजी पंढरीत दाखल होणार आहे. या सोहळ्यासाठी देहूनगरी सजली असून प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल झाले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. यासोबतच 19 तारखेला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आळंदीहून केलं जाणार आहे.

यंदाचा 340 वा पालखी सोहळा असून पालखी सोहळा प्रस्थान मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पुणे जिह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रात्री 12 पासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांना देहूत बंदी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

42 सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्ग ते देहूगाव कमानीपर्यंत प्रवेशास वाहनांना बंदी करण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील वाहने, बसेस, दिंडीतील वाहने व स्थानिक नागरिकांच्या हलक्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com