Solapur
Solapur

Solapur : 'या' तारखेपासून सोलापूरवरुन विमानसेवा सुरु होणार

दोन्ही मार्गांवरील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • 15 ऑक्टोबरपासून सोलापूरवरुन विमानसेवा सुरु होणार

  • सोलापूर-मुंबई, सोलापूर-बंगळुरू विमानसेवा सुरु होणार

  • आता दोन्ही मार्गांवरील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार

सोलापूरकरांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. ही सुविधा सोलापूरच्या वाहतुकीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती देताना सांगितले की, या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना मुंबई आणि दक्षिण भारतातील आयटी व औद्योगिक केंद्र असलेल्या बंगळुरूशी जलद व थेट संपर्क मिळेल. व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक तसेच भाविकांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरेल.

या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मंत्री मोहोळ यांनी सांगितले की, सोलापूरसारख्या ऐतिहासिक व औद्योगिक शहराला हवाईमार्गाने थेट जोडल्याने गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.

दरम्यान, स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे तसेच जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी या विमानसेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. उद्घाटन समारंभ 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही सेवांचा शुभारंभ केला जाईल.

या नव्या सेवेनुसार सोलापूरहून मुंबईकडे जाणारे विमान दुपारी 12:55 वाजता सुटणार असून, परतीचे मुंबई–सोलापूर उड्डाण दुपारी 2:45 वाजता होईल. त्याचप्रमाणे बंगळुरूहून सोलापूरकडे येणारे विमान सकाळी 11:10 वाजता प्रस्थान करेल, तर सोलापूरहून बंगळुरूकडे जाणारे उड्डाण दुपारी 4:15 वाजता सुटणार आहे. या वेळापत्रकामुळे प्रवाशांना सोयीस्कर नियोजन करता येणार असून, दोन्ही मार्गांवरील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com