Solapur Heavy Rain
Solapur Heavy Rain

Solapur Heavy Rain : सोलापुरात पावसाचा कहर; अनेक घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

सोलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

सोलापुरात मुसळधार पाऊस

अनेक घरात शिरलं पाणी

पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर

(Solapur Heavy Rain) सोलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर आणि शेळगी परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मुख्य महामार्गांवर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली असून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मदतकार्यात गुंतलेले आहेत. अनेक भागात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने घरात दुर्गंधीयुक्त पाणी घुसले आहे. यामुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. महापालिकेकडून सफाई आणि पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, सोलापूर शहरात मागील 24 तासांत 118.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातही पावसाचा मोठा फटका बसला असून अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढे-नाले तुडुंब भरले आहेत. बोरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग 1500 वरून 4000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भाग टाळण्याचे आवाहन केले आहे.

शिरवळवाडी तलावातील सांडवा ओव्हरफ्लो झाल्याने शिरवळ–वागदरी रस्ता बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com