गर्दीत उभं राहूनही लस मिळाली नाही…घरी आल्यावर मोबाईलवर आले सर्टिफिकेट

गर्दीत उभं राहूनही लस मिळाली नाही…घरी आल्यावर मोबाईलवर आले सर्टिफिकेट

Published by :
Published on

मयुरेश जाधव | मुंबईत एकीकडे लसीकरणाचा गोंधळ सुरु असताना अंबरनाथमध्ये गर्दीत उभं राहून सुद्धा लस मिळाली नाही आहे. मात्र कंटाळून घरी आल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट आले आहे. या अजब प्रकारामुळे तो पुरता गोंधळला आहे.

अंबरनाथच्या बारकूपाडा भागात राहणारे अशोक जाधव यांनी ऑनलाइन पद्धतीने कोविड लसीकरणाची नोंदणी केली होती. ठरलेल्या वेळी ते मलंगगड परिसरातील करवले गावातल्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले. मात्र गर्दीमुळे ५ तास उभं राहूनही त्यांना लस मिळाली नाही आणि ते घरी परतले. यानंतर ते दुसऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता तिथे तुमचं लसीकरण झालं असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्याचं सर्टिफिकेटही त्यांच्या अॅपमध्ये आलं होतं. मात्र लस न घेताच लसीकरण झाल्याची नोंद झाल्यानं अशोक जाधव यांना धक्का बसला.

आता आपल्याला लस मिळणार की नाही? या भीतीने त्यांनी करवले गावातल्या लसीकरण केंद्रावर जाऊन याबाबत तक्रार केली. मात्र तुम्ही दोन दिवसांनी परत या, तुम्हाला लस देऊ, असं त्यांना तोंडी सांगितलं गेलं. त्यामुळे नेमकं काय झालं? हे जाधव यांना समजायला मार्ग नव्हता.

याबाबत लसीकरण केंद्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता,सॉफ्टवेअरच्या अडचणींमुळे हा प्रकार घडला असून याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या २ ते ३ घटना या भागात घडल्याचंही समोर आलंय. जो नोंदणी करतो, त्याच्या मोबाईलवर येणारा गोपनीय ओटीपी दिल्याशिवाय लसीकरण होत नाही. मात्र ओटीपी न देताच लसीकरणाचं सर्टिफिकेट कसं काय तयार होऊ शकतं? याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com