Work Hours : आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
( Work Hours) महाराष्ट्रातील कामगार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात कारखाने आणि दुकानांमध्ये कामाचे तास वाढविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. अगोदर कारखान्यात कामाचे दैनंदिन तास 9 इतके होते, ते आता 12 करण्यात आले आहेत. कारखाने अधिनियम 1948 मधील कलम 65 अंतर्गत ही सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, मधल्या विश्रांतीचा कालावधी जो आधी 5 तासांनंतर 30 मिनिटे होता, तो आता 6 तासांनंतर 30 मिनिटांचा असेल.
नव्या नियमांनुसार दुकानांमध्ये कामाचे तास 9 वरून 10 करण्यात आले आहेत. तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ साडेदहावरून 12 तासांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय कलम 56 अंतर्गत आठवड्याचे कामाचे तास 48 वरून 60 करण्यात आले आहेत.
ओव्हरटाईमच्या बाबतीतही मोठा बदल झाला असून, मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना जादा कामासाठी अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे. तथापि, शासन मान्यतेशिवाय कारखान्यांना हे बदल करता येणार नाहीत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की, आठवड्याचे 48 तास ही मूलभूत मर्यादा ओलांडता येणार नाही. तसेच जादा काम घेतल्यास कामगारांना योग्य मोबदला आणि पगारी सुट्ट्यांचा लाभ देणे बंधनकारक असेल.
केंद्र सरकारच्या Ease of Doing Business धोरणाशी सुसंगत अशा या बदलामुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठी नियोजित, पारदर्शक व्यवस्था उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे.