Palghar : शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी लपले जंगलात; नेमकं प्रकरण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Palghar) शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी जंगलात जाऊन लपल्याची घटना घडली आहे. जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या मारहाणीच्या भीतीने काही विद्यार्थ्यांनी शाळेऐवजी जवळच्या जंगलात लपून बसल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे पालकांनी शिक्षण विभागावर कारवाईसाठी तगादा लावला असून, गंभीर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने पाच विद्यार्थ्यांना शाळेपासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर असलेल्या झऱ्यावर पाणी भरण्यासाठी पाठवले. मात्र रस्त्या लांब असल्यामुळे पाणी आणायला विद्यार्थ्यांना उशीर झाला.
उशीर झाल्याने शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. घाबरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहताच ते जंगलाकडे पळ काढून झाडीत लपून बसले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शोधून काढलं. या घटनेनंतर पालक आक्रमक झाले आहेत. शाळेतील पालकांच्या म्हणण्यानुसार , मुलांना वारंवार अंगणात अनावश्यकपणे उभे ठेवणे, अध्यापनाकडे दुर्लक्ष करून दिवसभर मोबाइलमध्ये राहणे, शनिवारी नेहमी गैरहजर राहणे, यामुळे गावकरी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गावकऱ्यांनी या शिक्षकावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली असून कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पालघरच्या जव्हारमधील मुलांनी शाळेत जाणं टाळलं
पाणी आणण्यासाठी शिक्षकाने मुलांना 2 किमी लांब पाठवलं
परतणाऱ्या 4-5 विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने बेदम मारहाण
