Dada bhuse : आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिकी प्रशिक्षण; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
(Dada bhuse ) विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघटनेची भावना विकसित व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता पहिल्या इयत्तेपासूनच प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी या उपक्रमाची घोषणा केली. त्यांच्या मते, राज्यभरातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर सैनिकी शिस्तीचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी राज्यात असलेल्या सुमारे अडीच लाख माजी सैनिकांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भुसे यांनी सांगितले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, व्यायामाची सवय, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.