अचानक पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यात आले एवढे कोटी

अचानक पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यात आले एवढे कोटी

बिहारमधील भागलपूर येथील नवगछिया येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक एक कोटी रुपये जमा झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

बिहारमधील भागलपूर येथील नवगछिया येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक एक कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम पाहिल्यानंतर शेतकऱ्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. बँकेने त्यांचं अकाऊंट फ्रीज केलं. मंगळवारी सकाळी शेतकऱ्याने स्वतः सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बँकेच्या खात्यात कधी दहा हजारापेक्षा जास्त रक्कम नसताना एक कोटी रुपये आले तर काय होणार?

त्या खात्याचे पासबुक गेली चार, पाच महिन्यांपासून भरले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्याने पासबुक बँकेतून भरुन आणण्यासाठी मुलाकडे दिले. मुलाने जेव्हा पासबुक भरुन आणले आणि शेतकऱ्याने पहिले तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये जमा झाले होते. बिहारमधील भागलपूर येथील शेतकरी संदीप मंडल यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला.

शेतकरी संदीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसबीआय बँक खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे येतात. एवढी मोठी कोटींची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय खात्यात वर्ग करण्यात आली आहे. ही मोठी रक्कम अचानक बँक खात्यात आल्याने गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. तसेच ते तणावात असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. संदीप मंडल यांनी आपल्या खात्यात एक कोटी आल्याची माहिती बँकेला जाऊन दिली. बँकेने त्वरित त्याचे खाते फ्रीज केले. त्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बँकेने सायबर पोलिसांकडून रिपोर्ट आल्यावर खाते पुन्हा सक्रीय करणार असल्याचे म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com