Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र; पत्रात काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Supriya Sule) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता सुप्रिया सुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'महाराष्ट्र राज्याची लोकशाही परंपरा मजबूत, सर्वसमावेशक आणि संवादप्रधान राहिली आहे. देशाचे महान नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीला गावागावांत पोहोचवण्याचे जे स्वप्न पाहिले होते, त्याचीच ही देशाच्या लोकशाही परंपरेतील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. ह्याच निवडणुकांमधून नवे नेतृत्व पुढे येते, जनतेच्या आकांक्षांना नवी दिशा मिळते आणि लोकशाहीमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते.'
'अलिकडे महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आहे. परंतु त्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात निवडणुका बिनविरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. तसेच अनेक ठिकाणाहून अशा सूचनाही प्राप्त होत आहेत की काही ठिकाणी दबाव टाकला जात आहे, कुठे भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे, तर काही ठिकाणी लोकशाहीविरोधी विविध प्रकारचे हातखंडे वापरले जात आहेत. ज्यामुळे सक्षम आणि इच्छुक उमेदवार नामांकन दाखल करण्यापासूनही वंचित राहत आहेत.'
'हे वातावरण केवळ लोकशाही मूल्यांच्या विरोधातच नाही, तर निवडणुकांमधील निरोगी स्पर्धेलाही बाधा आणणारे आहे. जनतेसमोर पर्यायच उपलब्ध नसेल तर स्थानिक स्वराज्याची मूळ भावना दुर्बळ होईल आणि लोकशाहीचे विकेंद्रीकरण हे उद्दिष्टही अपयशी ठरेल. म्हणूनच अतिशय जड अंतःकरणाने मी आपणांस हे पत्र लिहित आहे. आपल्याकडे नम्र विनंती आहे की या गंभीर विषयाकडे यथोचित लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलावीत.'
'महाराष्ट्रातील वर्तमान तसेच भावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पारदर्शक, स्वतंत्र व निर्भय वातावरणात पार पाडल्या जातील याची खात्री व्हावी. ज्या-ज्या ठिकाणी दबाव, बलप्रयोग अथवा कोणत्याही प्रकारच्या अनुचित कृत्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या ठिकाणी योग्य चौकशी करून कडक आणि आवश्यक कार्यवाही अनिवार्यपणे करण्यात यावी. महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही ही सरकार, विरोधक आणि जनता यांचा मूलाधार आहे. त्यामुळे तिला मजबूत आणि निष्पक्ष ठेवणे हे आपण सर्वांचे कर्तव्य आहे.' असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
Summery
सुप्रिया सुळे यांचे राज्य निवडणूक आयुक्तांना काळजी व्यक्त करणारे पत्र
'महाराष्ट्राची लोकशाही परंपरा मजबूत, सर्वसमावेशक आणि संवादप्रधान'
'उमेदवारांना धमकाविणे, दबाव टाकणे असे प्रकार घडले आहेत'
