राज्यात किमान तापमान ६ अंशांनी घसरले, ‘या’ जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद

राज्यात किमान तापमान ६ अंशांनी घसरले, ‘या’ जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद

Published by :

वायव्य भारत, मध्य भारताचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी २६ ते २९ जानेवारीदरम्यान थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग येथे किमान तापमान खाली उतरले. मुंबईमध्ये किमान तापमानात अवघ्या २४ तासांमध्ये ६ अंशांचा फरक नोंदला गेला. तर राज्यात नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव येथे तापमान १० अंशांपेक्षा कमी होते. महाबळेश्वर येथे ६.५ तर नाशिक येथे ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात अधिक होता. जळगाव येथे ९.२, मालेगाव येथे ९.६, नाशिक येथे ६.६ तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमधील गेल्या १० वर्षांमधील जानेवारीतील हे नीचांकी किमान तापमान होते. या आधी १९६८ मध्ये ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. नाशिकचा पारा मात्र जानेवारीमध्ये ५ अंशांपर्यंतही पोहोचलेला आहे.

सोमवारी नाशिकमध्ये २४ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ८.२ अंशांनी खाली उतरला. मात्र त्या मानाने नंतर कमाल तापमान फारसे खाली नव्हते. मध्य महाराष्ट्रात इतर ठिकाणी, विदर्भ, मराठवाडा येथेही कमाल आणि किमान दोन्ही तापमानाचा पारा उतरला होता. पुणे य़ेथे १०.४, औरंगाबाद येथे १०.२, बुलडाणा येथे ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर मध्य महाराष्ट्रात मंगळवार ते गुरुवारदरम्यान थंडीची लाट अधिक जाणवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

गारठलेली शहरे
महाबळेश्वर ६.५
नाशिक ६.६
जळगाव ९.२
मालेगाव ९.६
बारामती १२.५
पुणे १०.४
चिखलठाणा १०.२
परभणी १२.९
नांदेड १४.६
ठाणे १९
मुंबई १५
माथेरान ७.६
डहाणू १३.६
सोलापूर १४
कोल्हापूर १६.१
उस्मानाबाद १४.७
जेऊर १२
सांगली १६.४

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com