Uddhav Thackeray : "मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण..." मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅली, मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे. यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी सवाल विचारला की, मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल हे आपण सातत्याने म्हणतो, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. याच्यावर विश्वास ठेवता का?
यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक आहे. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराती आहे."
"आमच्यावर हिंदीची सक्ती करणार, म्हणजेच तुम्ही आमची सगळी अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार. या गोष्टीला काही अर्थ नाही. राज आता जसं म्हणाले की, बस म्हटलं की बस आणि ऊठ म्हटलं की ऊठ मानणारी ही लोकं आहेत. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावर राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "त्यांच्या हातातच मुळात काही नाही. इच्छा चांगली आहे, पण जे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. ‘वरून’ सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळं वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही.त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले दोघेजण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय." असे राज ठाकरे म्हणाले.
Summary
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
" मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक"
