Mumbai Politics: धारावीपासून ते दादर, लालबाग वरळी, शिवडीपर्यंत फक्त ठाकरें बंधूंनाच मराठी मनाचा कौल!
अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीने झालेल्या आणि श्वास रोखून धरायला लावलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं. या निवडणुकीमध्ये ठाकरे संपणार असं सुद्धा पुन्हा भाजप शिंदेंकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनं भाजप शिंदे गटाच्या घौडदौडीला अक्षरशः लगाम घातल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे. दुसरीकडे कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या काँग्रेस आणि एमआयएमने सुद्धा मिळवलेल्या जागा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. त्यामुळे मुंबईचा निकाल जो एकतर्फी बोलला जात होता तो निश्चितच लागलेला नाही.
मुंबईमधील लढाई मराठी विरुद्ध उत्तर भारतीय आणि गुजराती अशीच होती. मात्र, या लढाईमध्ये ठाकरे बंधूंनी यश मिळवल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंना मराठी मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे उत्तर भारतीयांनी गुजरातीच प्रभाव ज्या प्रभागांमध्ये आहे ते प्रभाग मात्र अपेक्षेप्रमाणे भाजप महायुतीला मिळाले आहेत. भाजपच्या यादीमध्ये 89 नगरसेवक असतील असले तरी त्यामध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय सर्वाधिक आहेत.
मुंबईमध्ये भाजप हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. भाजपला 89 जागा मिळाल्या, तर शिवसेना ठाकरे गटाला 65 जागा मिळाल्या. मात्र, भाजपच्या 89 जागांमध्ये जवळपास तब्बल 25 विजयी उमेदवार हे उत्तर भारतीय किंवा गुजराती आहेत. त्यामुळे या उमेदवारांमुळेच भाजपला पहिल्यांदाच महापौर करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे, मुंबईमध्ये मराठीचा बालेकिल्ला असलेल्या दादर, वरळी, शिवडी या भागामध्ये 21 पैकी 19 जागा या ठाकरे बंधूंनी जिंकल्या आहेत. यामध्ये एक जागा अवघ्या 100 मतांनी गमावली. त्यामुळे 21 पैकी 21 जागा याना मिळतील असं बोललं जात होतं. मात्र, 21 पैकी 19 जागा जिंकत मराठी मनाला साद घालण्यात ठाकरे बंधू यशस्वी झाले आहेत.
दुसरीकडे, धारावीमधील सातपैकी सहा जागी महायुतीचा पराभव झाला आहे. धारावीचा पुनर्विकास सुरू असताना धारावीकरांची मात्र उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. चार जागा पटकावत उद्धव ठाकरे यांनी मुसंडी मारली. काँग्रेस दोन जागी विजय झाला. अलीकडेच भाजपचा झेंडा हाती घेतलेले आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा देखील पराभव झाला.
याच निवडणुकीत दुसरं चित्रही दिसलं. दादर, लालबाग, परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवीसारख्या मराठीबहुल भागांत ठाकरे गट आणि मनसेने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे “मुंबई आता मराठी शहर राहिलेलं नाही” हा दावा इथं सपशेल फोल ठरला. ज्या भागात मराठी मतदार निर्णायक आहेत, तिथे अजूनही ठाकरे ब्रँड चालतो, हे या निकालानं स्पष्ट केलं. वरळी–प्रभादेवीत ठाकरे–मनसे आघाडीने 6 पैकी 5 जागा जिंकल्या.
मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय समाज हा आजही शहराच्या राजकारणात निर्णायक आहे. विशेषतः उपनगरांमध्ये या समाजाची संख्या मोठी आहे आणि तिथेच भाजप–शिंदे शिवसेनेचा विजय झाला. म्हणजेच गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांसाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेला पर्याय दिल्याने महायुतीला उपनगरांत यश मिळालं.
