Mumbai BMC: घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्क्वेअर फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईसाठी ठाकरेंचा मोठा जाहीरनामा
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं चित्र स्पष्ट झालं असून शिवसेना-मनसे युतीकडून मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. दादर येथील शिवसेना भवनात शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आला. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असलेल्या अनेक मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत.
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ‘स्वाभिमान निधी’
जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांचा ‘स्वाभिमान निधी’.
“ही निवडणुकीपुरती योजना नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर हा निर्णय राबवू. निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करण्याची आमची पद्धत नाही,” असं स्पष्ट करत ठाकरे बंधूंनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली. याशिवाय कोळी महिलांसाठी ‘माँ साहेब किचन’च्या माध्यमातून अवघ्या 10 रुपयांत पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.
मुंबईकरांच्या करभाराला दिलासा
मुंबईकरांवरील आर्थिक ओझं कमी करण्यासाठी करप्रणालीत मोठे बदल करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.
सध्या 500 चौरस फुटांपर्यंत असलेल्या घरांना मिळणारी मालमत्ता कर सवलत वाढवून ती 700 चौरस फुटांपर्यंत नेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे मध्यमवर्गीय मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तरुणांसाठी स्वयंरोजगाराला चालना
मुंबईतील बेरोजगारी आणि रोजगाराच्या संधी या मुद्द्यावर भर देत ठाकरे बंधूंनी तरुणांसाठी विशेष योजना जाहीर केली.
एक लाख तरुण-तरुणींना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार सहाय्यता निधी देण्यात येणार असून, यामुळे नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात मोठे बदल
आदित्य ठाकरेंनी शिक्षण क्षेत्रासाठीही ठोस घोषणा केल्या.
पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात येणार
दहावीनंतर विद्यार्थ्यांना बीएमसीच्या माध्यमातूनच 11-12 वीचं शिक्षण घेता येणार
सर्व बोर्डांच्या शाळा सुरू केल्या जातील, मात्र मराठी भाषा अनिवार्य असेल
वाहतूक, पार्किंग आणि पादचारी धोरण
मुंबईतील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक फ्लॅटसाठी एक पार्किंग जागा बंधनकारक करण्याचा विचार जाहीर करण्यात आला. जिथे बीएमसीची पार्किंग व्यवस्था आहे, ती मोफत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ, मोकळ्या जागा आणि चालण्यासाठी सुयोग्य रस्ते उपलब्ध करून देण्याचा निर्धारही जाहीरनाम्यात करण्यात आला.
वीज-पाणी सवलत आणि पर्यावरणावर भर
मुंबईकरांसाठी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टमार्फत वीजपुरवठा कसा करता येईल, यावर काम केलं जाणार आहे.
पाण्याचे दर स्थिर ठेवण्याचंही आश्वासन देण्यात आलं. यासोबतच मुंबईसाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅन राबवून पर्यावरणपूरक विकासावर भर दिला जाणार आहे.
युवा मुंबईकरांसाठी सुविधा
- प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
- प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर
- आंतरराष्ट्रीय दर्जाची सार्वजनिक शौचालये
आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष
मुंबईत आणखी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॅन्सर रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली. लवकर निदान (Early Detection) होण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
BPT जमीन आणि मुंबईची आर्थिक ओळख
मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून ओळख जपण्यासाठी BPT कडे असलेल्या सुमारे 1800 एकर जमिनीवर मुंबईचा हक्क मिळवण्यासाठी लढा देणार, असं जाहीर करण्यात आलं. गरज पडल्यास न्यायालयीन लढाईही लढली जाईल, असं ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं.
अमित ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
अमित ठाकरे यांनी भाषणात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “सत्तेचा माज उतरवायचा आहे. घमंड मोडायचा आहे. नगरसेवक हा मुंबईकरांचा प्रतिनिधी आहे, तो सत्तेचा मालक नाही,” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
