Kolhapur : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु होणार
( Kolhapur) कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल 40 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. 18 ऑगस्ट 2025 पासून हे बेंच कार्यान्वित होणार असून, यासंबंधीची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमधील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत हजारो प्रलंबित खटल्यांसाठी पक्षकारांना मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता. आता मात्र स्थानिक पातळीवरच न्याय मिळणार असल्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना उच्च न्यायालयीन कामकाजासाठी दूरवर मुंबईला जावे लागते. यामुळे न्यायप्रक्रियेत वेळ लागतो आणि खर्चही वाढतो. सर्किट बेंचमुळे हे अंतर ओलांडण्याची गरज संपेल आणि न्यायप्रक्रिया अधिक वेगवान होईल.सध्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोरील इमारतीत कामकाज सुरू होणार असून, त्यासाठी आवश्यक दुरुस्तीचे काम प्रगत अवस्थेत आहे. पुढील टप्प्यात स्वतंत्र न्यायालय संकुल उभारण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.
या निर्णयामागे जिल्हा बार असोसिएशनसह विविध वकील संघटनांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा सातत्याने पाठिंबा राहिला. नागरिकांच्या सामूहिक संघर्षामुळेच अखेर ही ऐतिहासिक घोषणा शक्य झाली.ब्रिटिश कालखंडात कोल्हापुरात सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाचे कामकाज होत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर ते बंद झाले. त्यानंतर याच न्यायालयाच्या पुनर्स्थापनेसाठी गेल्या चार दशकांपासून मागणी सुरू होती. आता ती मागणी प्रत्यक्षात उतरली आहे.
या ऐतिहासिक घडामोडीनंतर कोल्हापूर शहरात आणि परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होणे हा निर्णय केवळ न्याय व्यवस्थेसाठीच नव्हे, तर सहा जिल्ह्यांतील लाखो नागरिकांसाठी परिवर्तनाचा टप्पा ठरणार आहे. न्याय मिळवण्याचा मार्ग आता अधिक सोपा, जलद होणार आहे.