Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्याचा धुरळा; शिवसेनेच्या मंत्र्यांचा बहिष्कार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला नवा क्लायमॅक्स प्राप्त झाला आहे. महायुतीत सुरू झालेलं नाराजीनाट्य सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उघडपणे दिसून आलं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकजुटीने घेतलेल्या बहिष्काराच्या निर्णयामुळे मंत्रालयातील वातावरण तणावपूर्ण झालं असून, सहाव्या आणि सातव्या मजल्यांवर दिवसभर राजकीय गतीमानता वाढली. राज्यात निवडणूक तापली आहे… आणि त्यामुळेच भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी राजकीय ‘इन्कमिंग–आउटगोइंग’ची मालिका वाढतच चालली आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी, अगदी पंचायतीपासून जिल्हा स्तरापर्यंत, तिकिटाची आस धरून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात हलत आहेत. या हलचालींचा फटका महायुतीतील संतुलनावर बसत असून, सर्वाधिक अस्वस्थता शिंदे गटात पाहायला मिळते.
याच नाराजीचा उद्रेक आज मंत्रालयात झाला. सातव्या मजल्यावर पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने हजेरी लावली नाही. उपस्थित होता तो फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण त्यांच्या सोबतचा मंत्रीवर्ग गायब! हे दृश्य पाहताच, नाराजीची तीव्रता किती खोलवर गेली आहे, याचा अंदाज आला. सुरुवातीला निधीवाटप, शासकीय व्यवस्था आणि विभागीय निर्णयांवरून कुरबुर होती. मात्र या नाराजीत खरा सल म्हणजे—शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांचा भाजपात होत असलेला वेगवान ओघ. अनेक जिल्ह्यांत शिवसेनेचे पदाधिकारी भाजपाच्या संघटनेत दाखल झाल्यानं शिंदे गटाची तटबंदी कमकुवत होत असल्याची भावना पक्की झाली. आणि याच पार्श्वभूमीवर आजचा बहिष्कार हे राजकीय अस्त्र म्हणून उपसण्यात आलं.
यानंतरची नाट्यमय धावपळ मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर दिसून आली. बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. बंद दाराआड झालेल्या चर्चेत ‘इन्कमिंग’बाबत जोरदार चर्चा रंगल्याचं सूत्रांनी सांगितलं. फडणवीसांनी शिंदे गटाला सुनावल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने फिरू लागल्या “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्हीच केली; मग दोष आमच्यावर का?” तसेच पुढील काळात परस्परांच्या पक्षातील नेत्यांना न घेण्याचं सूचनात्मक आवाहनही करण्यात आल्याची चर्चा आहे.
या घडामोडी थांबल्या नाहीत. काही वेळातच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने, नाराजीनाट्यानंतरचा पुढचा ‘डाव’ काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचं हे अंतर्गत समीकरण किती खोलवर हललं आहे, आणि आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत त्याचे परिणाम कसे उमटणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला नवा क्लायमॅक्स प्राप्त झाला आहे.
महायुतीत सुरू झालेलं नाराजीनाट्य सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उघडपणे दिसून आलं.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकजुटीने घेतलेल्या बहिष्काराच्या निर्णयामुळे मंत्रालयातील वातावरण तणावपूर्ण झालं.
सहाव्या आणि सातव्या मजल्यांवर दिवसभर राजकीय गतीमानता वाढली. राज्यात निवडणूक तापली आहे.

